जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून जनतेला भ्रमीत केल्याचे आता सर्वांना लक्षात आले असल्याने आता त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही. मोदींची हवा पूर्णपणे संपली आहे. आता सत्तापरिवर्तन होणारच, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या मतदारसंघातील उमेदवारांचे बुधवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आघाडीतील इतर घटकपक्षांतर्फे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

हेही वाचा – धुळे मतदारसंघात एमआयएमकडूनही उमेदवार ?

राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोदी व भाजपच्या भूलथापांना आता जनता भुलणार नाही. राज्यात मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळताना दिसत नसून, मोदींसह त्यांचा पक्ष किती खोटारडा आणि फसवा आहे, हे जनतेला समजून चुकले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यासह देशभरातील वातावरण बदलताना दिसत आहे. राज्यात मोदींची सभा कधी सुरू होते आणि कधी संपते, मोदी परत कधी गेले, हे कोणालाच समजत नाही, असे राऊत यांनी नमूद केले.

हेही वाचा – नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व महाराष्ट्रातून संपलेले असेल, असे भाकीत करीत कोणाचे संतुलन बिघडले आहे आणि कोणाचे काय झाले, हे लोकसभा निवडणूक निकालानंतर अर्थात चार जूननंतर समजेल, असे राऊत यांनी सांगितले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार तर, नवनीत राणा या तिसर्‍या स्थानावर असतील. सिंचनासह व शिखर बँक यातील ७० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत मोदी आरोप करीत होते. आता आरोपीच भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यानंतर शिखर बँक घोटाळ्याचा डाग धुतला जातो, यावरून मोदी किती खोटारडे आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे, हे दिसून येते. मोदी हे खोटे बोलणारे नेते आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes narendra modi in jalgaon ssb