मालेगाव : साडेतीन वर्षीय निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याच्या तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अबालवृद्ध आणि सर्व स्तरावरून या घटनेची निर्भत्सना करण्यात येत आहे. असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला तात्काळ फासावर लटकवावे, यासाठी गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र आक्रोश केला जात आहे. मंगळवारी याच मागणीसाठी मालेगाव येथे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डोंगराळे येथे संतप्त महिला व विद्यार्थिनींनी दुसऱ्या दिवशी देखील रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सायंकाळी गावात ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला.

डोंगराळे येथील ही चिमुकली रविवारी दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ झाल्यावरही ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केल्यावर रात्री तिचा मृतदेह आढळून आला. या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण गाव हादरुन गेले. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून गावातीलच विजय संजय खैरनार (२४) यास अटक केली. संशयीताने चॉकलेटचे नाव करुन या चिमुकलीला  घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून तिची निर्दयीपणे हत्या केली. तसेच हे पाप लपविण्यासाठी त्याच्या घराशेजारीच असलेल्या मोबाईल टॉवरजवळील झाडाझुडपांत तिचा मृतदेह टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृत चिमुकलीच्या पालकांच्या घराशेजारीच संशयीताचे घर आहे. महिन्याभरानपूर्वी या कुटुंबाशी त्याचे किरकोळ भांडण झाले होते. त्या रागातून संशयीताने या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे.

या घटनेमुळे सोमवारी डोंगराळे येथे गावकऱ्यांनी बंद पाळून मालेगाव – कुसुंबा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला जाहीर फाशी द्या,असा आग्रह गावातील संतप्त महिला व विद्यार्थिनींनी धरला. सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात या चिमुकलीवर डोंगराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचे मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील तीव्र पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला लवकर फाशी व्हावी, या मागणीसाठी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर मंगळवारी देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मालेगावातील शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थिनींनीही मंगळवारी महात्मा गांधी पुतळ्यापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चात विद्यार्थिनींबरोबर विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच शाळा,महाविद्यालयांचे विद्यार्थी सामील झाले होते. आरोपीला फाशी द्यावी, निष्पाप चिमुकलीला न्याय द्यावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशा मागण्यांचे फलक हातात घेतलेल्या विद्यार्थिनी यावेळी आक्रमक झाल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ डोंगराळे, मालेगावसह विविध ठिकाणी मंगळवारी सायंकाळी ‘कॅन्डल मार्च’काढण्यात येत आहे.

नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी करत वंदे मातरम् संघटना, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समिती, सुवर्णकार संघटना आदी संस्था व संघटनांतर्फेही अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. असे दुष्कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होऊ नये म्हणून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा आग्रह विविध संघटना व कार्यकर्त्यांकडून धरण्यात येत आहे.