नाशिक – लोकसभा निवडणुकीआधी म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय ऐरणीवर आला होता. तेव्हा केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद स्थानिक पातळीवर उमटत होते. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे आयोजित रास्ता रोको आंदोलनात खुद्द शरद पवार हे सहभागी झाले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवरून पक्षाने येथे आयोजिलेल्या मोर्चात शरद पवार हे पुन्हा सहभागी होणार आहेत.
पाच ते सहा महिन्यांपासून कांदा दर एक ते दीड हजाराच्या दरम्यान आहे. मागील काही दिवसांत त्यात आणखी घसरण झाली. पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. हमीभाव व पीक विमा अशा शेतकऱ्यांशी संंबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार) १५ सप्टेंबर रोजी येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे १४ सप्टेंबरला कार्यकर्ता शिबीर आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा असे नियोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी नाशिक दौऱ्यात पूर्वतयारीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पहिल्याच दौऱ्यात या मोर्चाचे सुतोवाच केले होते.
कृषिबहुल नाशिक हा शरद पवार यांचा आवडता जिल्हा. पुलोद सरकारच्या प्रयोगावेळी नाशिकने त्यांना साथ दिली होती. शेतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांविषयी ते नेहमीच बोलतात. संपूर्ण देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणारा हा जिल्हा आहे. कांद्यासह अन्य कृषिमालावर ग्रामीण भागाचे अर्थचक्र अवलंबून आहे. सहा महिन्यांपासून कांद्याला भाव नसल्याने उत्पादक अडचणीत आहे. पावसामुळे नाशिकसह राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकरी वर्गातील अस्वस्थता मांडण्यासाठी शरद पवार गटाने मोर्चासाठी नाशिकची निवड केली. पक्षाचे सर्व आमदार सोडून गेलेले असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे या पक्षाच्या सामान्य उमेदवाराने भाजपच्या मंत्री डॉ. भारती पवार यांना पराभूत केले होते. पुढे विधानसभा निवडणुकीत मात्र तसे यश पक्षाला मिळाले नाही. महाविकास आघाडी सर्व जागांवर पराभूत झाली. अवघ्या काही महिन्यात परस्परविरोधी निकाल लागले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीसाठी पवार हे पुन्हा सक्रिय झाले आहे. १४ तारखेला पक्षाचे सर्व नेते नाशिकला येतील. पहिल्या दिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यंचे चर्चासत्र आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेला मोर्चा काढण्यात येईल, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना महायुती सरकार कुरघोडी, भांडण्यात आणि जाहिरातबाजीत व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.