नाशिक – जिल्ह्यातील देवळा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. शिवनिश्चल सेवाभावी संस्थेच्या वतीने अनाथांना मदतनिधी आणि शिवनिश्चल पूरस्कार सोहळा असा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शरद पवार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना ज्यांना आई-वडिलांचा आधार नाही, अशा अनाथांना दत्तक घेऊन त्यांच्या आयुष्यात आधार बनून त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी शिवनिश्चल सेवाभावी संस्था पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
नेमके शरद पवार यांना अभिप्रेत सामाजिक कार्य करणारे मालेगाव तालुक्यातील बंडूकाका बच्छाव हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांची उपस्थिती सर्वांनाच धक्का देणारी ठरली असताना शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी थेट जाहीरपणे त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले. देवळ्यातील कार्यक्रमास बंडूकाका यांची उपस्थिती आणि खासदार लंके यांच्याकडून त्यांना पक्ष प्रवेशाचे आवाहन, यामुळे बंडूकाकांची पावले शरद पवार गटाच्या दिशेने पडू लागल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १९९९ नंतर म्हणजे २६ वर्षांनंतर देवळा येथे आले होते. त्यामुळे पवारप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, सुप्रिया सुळे, भास्कर भगरे, निलेश लंके या तीन खासदारांसह विलास बडे, मंगेश चिवटे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, निंबाबाई सूर्यवंशी, देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्र आहेर, देवळा मर्चंट बँकेचे अध्यक्ष कोमल कोठावदे यांच्यासह बंडूकाका बच्छाव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वरुप सामाजिक असले तरी त्यास खासदार निलेश लंके यांनी बंडूकाका यांना दिलेल्या प्रस्तावामुळे राजकीय किनार लाभली. खासदार लंके यांनी बंडूकाका यांना आपल्या पक्षात येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर दिला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला. यावरुन बंडूकाका यांची मालेगाव तालुक्याबाहेरही असलेली लोकप्रियता शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या लक्षात आली नसेल तरच नवल. मालेगाव तालुक्यात बारा बलुतेदार मंडळाचे प्रमुख म्हणून बंडूकाका बच्छाव हे सातत्याने वेगवेगळे सामाजिक कार्य करीत असतात.
सर्वधर्मीयांसाठी असलेला सामूदायिक विवाह सोहळा असो किंवा कोणत्याही आपदग्रस्तांना मदतीची गरज असो, बारा बलुतेदार मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी तत्पर असतात. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी प्रारंभी बंडूकाका यांचे निकटचे संबंध होते. या संबंधात वितूष्ट निर्माण झाल्यानंतर त्यांनी भुसे यांची साथ सोडली. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मालेगाव बाह्य या दादा भुसे यांच्या मतदारसंघातून उमेदवारी करण्याचे निश्चित केले.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेत (उध्दव ठाकरे) प्रवेश केलेले अव्दय हिरे यांना उमेदवारी जवळपास निश्चित होती. परंतु, हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच त्यांना नाशिक जिल्हा बँक कर्ज घोटाळ्यात कारागृहात जावे लागले. त्याच दरम्यान बंडूकाका हे ठाकरे गटात सक्रिय झाले. हिरे कारागृहात असल्याने बंडूकाका यांना भुसेंविरोधात ठाकरे गट रिंगणात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच नऊ महिने कारागृहात राहिलेले अव्दय हिरे ऐन निवडणुकीवेळी बाहेर आले.
ठाकरे गटाकडून उमेदवारी त्यांनाच मिळाली. त्यामुळे नाराज बंडूकाका यांनी अपक्ष उमेदवारी केली. भुसे यांच्याविरुध्द लाखापेक्षा अधिक मते घेऊन बंडूकाका दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बंडूकाका हे ठाकरे गटाचे उमेदवार असते तर कदाचित भुसे हे पाचव्यांदा विधानसभेत जाऊ शकले नसते, अशी प्रतिक्रिया त्यानंतर उमटली होती.
काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमात हिरे समर्थक पवन ठाकरे यांनीही हाच मुद्दा मांडला होता. विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यापासून अव्दय हिरे तालुक्यात फारसे सक्रिय नसताना बंडूकाका यांनी त्यांचे सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. राजकीय पक्षाशी संबंधित नसतानाही बंडूकाका यांची अफाट लोकप्रियता कोणालाही अचंबित करणारी आहे. त्यामुळेच आता शरद पवार गटाची नजर त्यांच्यावर पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंडूकाका कोणती राजकीय वाट धरतात, हे कळेल.