नाशिक : सिन्नर तालुक्यात मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीतील आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तालुक्यात मेंढ्या चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी राजस्थानात जाऊन संशयिताला अटक केली.

मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव, दोडी, दुशिंगवाडी, धोंडवीरनगर तसेच राहता तालुक्यातील देर्डे, कोऱ्हाळे परिसरात रात्री शेत परिसरात मुक्कामी असलेल्या मेंढपाळांच्या सुमारे ९० मेंढ्या चोरीस गेल्या होत्या. सिन्नर, वावी येथे यासंदर्भात चार गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने गुन्हा करण्याची पध्दत तसेच महाराष्ट्र आणि परराज्यातील अभिलेखावरील आरोपींची माहिती घेतली.

गुन्हेगार हे राजस्थानातील असल्याचे समजल्यानंतर राजस्थानातील कोटा येथे सलग चार दिवस संशयिताच्या हालचालींवर पाळत ठेवून रावल उर्फ राहुल बंजारा (२१, रा. कछालिया, राजस्थान) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित अब्दुल बारी (रा. कोटा), राजु बंजारा, लक्ष्मण बंजारा, किसन बंजारा, चिंटु बंजारा, बिन्टु बंजारा (रा. कछालिया, राजस्थान) यांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने सांगितले. रावल हा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर राजस्थानातही बकरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संशयित हे राजस्थानातील कोटा आणि बुंदी जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने मेंढपाळांच्या कळपाची त्यांना माहिती होती. रावलविरूध्द वावी, सिन्नर, राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार ताब्यात घेतली. त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

रावल हा सराईत गुन्हेगार असून त्याची टोळी बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने त्याला मेंढपाळ, बकरी पालनातील बारकावे माहिती होते. राजस्थानातील कोटा आणि बुंदी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बकरी पालनाचा व्यवसाय करतात. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने ते मेंढ्यांच्या कळपाबाबत माहिती घेत सिन्नर तालुक्यात आले होते, असे तपासात उघड झाले. टोळी दिवसा मेंढपाळ वस्त्यांवर पाहणी करुन रात्री चारचाकी वाहनांमधून येत मेंढ्यांची चोरी करत. अब्दुल बारीमार्फत चोरलेल्या मेंढ्यांची विक्री करुन मिळालेले पैसे आपआपसात वाटून घेतले असल्याची कबुली रावलने दिली.