जळगाव : जिल्ह्यातील जामनेरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत सायबर कॅफेत बसल्याच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने एका तरूणाचा सोमवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरूच आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा आता केली आहे.
बेटावद खुर्द येथील रहिवाशी असलेला तरूण सुलेमान पठाण (२१) हा तरूण त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. जामनेर शहरातील एका सायबर कॅफेत तो एका अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती त्याच्या गावातील काही तरूणांना मिळाली होती. त्यानुसार, तरूणांच्या टोळक्याने सोमवारी सायंकाळी कॅफेवर जाऊन सुलेमानला बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता त्याला बसस्थानकावर तसेच बेटावद येथे गेल्यानंतर त्याच्या घराजवळही मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेला सुलेमान घरी गेल्यानंतर पाणी प्यायला. आणि त्यानंतर भोवळ येऊन त्याचा मृत्यू झाला होता. सुलेमान हा बारावीनंतर पोलीस बनण्याचे स्वप्न पाहत होता. आणि त्यासाठी त्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी देखील सुरू होती. सोमवारी जामनेरमध्ये तो सायबर कॅफेमध्ये बसलेला असतानाच एका मुलीसोबत बसल्याच्या संशयावरून त्याच्यावर १० जणांनी अचानक हल्ला केला. त्यानंतर घरी गेल्यावर लगेच त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
मृत सुलेमानचे वडील रहीम पठाण यांनी तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांच्या विरोधात मॉब लिचिंगसह खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुलेमानच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या जमावातील संशयितांपैकी १० जणांची ओळख पटली असून, त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी मृत सुलेमानच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. त्या बाबतीत एक-दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. कसून तपास करून जे कोणी संशयित सुलेमानच्या मृत्युला जबाबदार ठरले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अटकेतील संशयितांशिवाय आणखी काही संशयित घटना घडल्यापासून फरार आहेत. त्यांच्याही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली आहे.
दरम्यान, सुलेमानचा जमावाच्या हल्लात मृत्यू झाल्यानंतर जामनेर शहरासह बेटावद गावामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने जामनेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, कायदा सुव्यवस्थेची स्थिती आता नियंत्रणात आहे. कायदा हातात न घेण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.