State Excise Department bribe, State Excise Department nifad, उत्पादन शुल्क विभाभ कर्मचारी लाच | Loksatta

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखोरी उघड; हॉटेल व्यावसायिकाकडून लाच घेताना तिघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचारी हप्ता वसुली करीत असल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाली आहे.

State Excise Department bribe
राज्य उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखोरी उघड (प्रातिनिधिक छायाचित्र)

हॉटेल व्यवसायात कुठल्याही त्रुटी न काढता ते सुरळीत चालू देण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचारी हप्ता वसुली करीत असल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाली आहे. तीन हॉटेलच्या वार्षिक प्रत्येकी तीन हजारांच्या हप्त्यापोटी एकूण नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादनच्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

या कारवाईची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली. निफाड तालुक्यात तक्रारदाराचा बार आणि रेस्टॉरंट आहे. हॉटेल व्यवसायाच्या कामात कुठल्याही त्रुटी न काढता ते सुरळीत चालू ठेवण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्कच्या फिरत्या पथकातील जवान लोकेश गायकवाड (३५) आणि हिशेबनीस पंडित शिंदे (६०, निफाड) यांनी चार हजार रुपये वार्षिक हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीअंती प्रति हॉटेल तीन हजार रुपये वार्षिक हप्त्यापोटी देण्याचे निश्चित झाले. तीन हॉटेलचे मिळून नऊ हजार रुपयांचा हप्ता संशयितांनी हिशेबनीस प्रवीण ठोंबरे (४७, निफाड) याच्यामार्फत स्वीकारला. लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले.

हेही वाचा – नाशिक: उमराणेजवळ बस-मालमोटार अपघातात; ४० प्रवासी जखमी

ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक एन.एस.न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, नितीन कराड व चालक परशराम जाधव या पथकाने सापळा यशस्वी केला.

हेही वाचा – नाशिक : वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी दादा भुसे, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनाही आमंत्रण

या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहर व ग्रामीण भागात शेकडो हॉटेल आहेत. यातील अनेक ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्याने मद्य विक्री केली जाते. व्यावसायिकांना ठराविक कालावधीत मद्य विक्रीचे हिशेब सादर करावे लागतात. या प्रक्रियेत त्रुटी काढून राज्य उत्पादनाचे कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांना वेठीस धरू शकतात. त्याचा धाक दाखवत काही कर्मचारी राजरोस हप्ता वसुली करीत असल्यावर या कारवाईने प्रकाश टाकला आहे. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कुठलेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:28 IST
Next Story
नाशिक: उमराणेजवळ बस-मालमोटारचा अपघात; ४० प्रवासी जखमी