scorecardresearch

नाशिक : वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी दादा भुसे, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनाही आमंत्रण

नाशिकच्या गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ९९ वर्षांपासून एक ते ३१ मे असे सलग महिनाभर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे.

Dada Bhuse Vasant vyakhyanmala
वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी दादा भुसे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – नाशिक वसंत व्याख्यानमालेचा मे महिन्यात शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त स्थापित करण्यात आलेल्या स्वागत समिती अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नाशिकच्या गोदाघाटावरील देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर ९९ वर्षांपासून एक ते ३१ मे असे सलग महिनाभर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. ही व्याख्यानमाला भव्यदिव्य होण्यासाठी समाजाच्या विविध घटकातील प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वागत समिती स्थापित करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी वसंत व्याख्यानामालेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शताब्दी वर्ष महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

हेही वाचा – जळगाव : जिल्हा बँक अध्यक्षपदाचा देवकर यांचा राजीनामा

बैठकीच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर मालेचे उपाध्यक्ष विजय हाके यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची माहिती दिली. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी मे १९०५ मध्ये ही व्याख्यानमाला सुरू केली. तीन वर्षे ती सुरू होती. न्या. रानडे यांची नाशिकहून बदली झाल्यानंतर व्याख्यानमालेचे कामकाज थंडावले. पुढे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या प्रेरणेने कृष्णाजी वझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक मे १९२२ रोजी व्याख्यानमाला पुनःश्च सुरू केली. संपूर्ण मे महिनाभर सुरू असणाऱ्या या व्याख्यानमालेचे कामकाज ९९ वर्षांपासून अखंड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – धुळे : दुषित पाण्यामुळे महिलांचा धुळे महापालिकेवर मोर्चा

मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी व्याख्यानमालेचा शताब्दी वर्ष महोत्सव भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन असून त्यासाठी उद्घाटन आणि समारोपाकरिता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले. यंदा व्याख्यानमालेत जगाच्या विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करणारे १० विचारवंत विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या विविध राज्यांतील १० नामवंत वक्ते व्याख्यानासाठी येणार आहेत. स्थानिक कलावंत आणि विचारवंतांनादेखील संधी देण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी नाशिकची वसंत व्याख्यानमाला संपूर्ण भारत देशाचे भूषण असल्याने या व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष आपण सर्वजण अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरे करू, असे सांगितले. यासाठी महाराष्ट्र शासन, नाशिक महानगरपालिका आणि नाशिककर नागरिक सर्वतोपरी सहकार्य करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:30 IST