लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : छगन भुजबळ यांनी आपणास प्रचारात गती वाढविण्याची आणि कांदा प्रश्नावर भूमिका मांडण्याची सूचना केल्याचे दिंडोरी मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर डॉ. पवार आणि भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांनी, प्रचारासाठी वेळ थोडा असला तरी संपूर्ण शक्तीने प्रचारात महायुती उतरणार असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण डॉ. पवार यांच्याबरोबर जाणार, तोपर्यंत नाशिकचाही उमेदवार जाहीर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी असल्याचे काँग्रेसने जाहीर केले असले तरी अन्य पक्षांचे काय, हेही लक्षात घ्यायला हवे. महायुतीचे असे नाही. मोदी हे पंतप्रधान म्हणून सर्वांना मान्य आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० मे रोजी जिल्ह्यात जाहीर सभा होणार असून कांदा किंवा अन्य प्रश्नावर ते बोलतील. सध्या एक लाख टन कांद्याच्या निर्यातीची परवानगी मागण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक : सिडको चौपाटीतील आगीत तीन जण गंभीर

यावेळी डॉ. पवार यांनी, भुजबळ ज्येष्ठ नेते तसेच मार्गदर्शक असून जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून काय करता येईल, याविषयी ते सातत्याने सूचना करत असतात, असे सांगितले. दिंडोरी मतदार संघातून दोन मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे निश्चित झाल्याने आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. लवकरच महायुतीचा नाशिक मतदार संघातील उमेदवार जाहीर होईल. त्यानंतर प्रचाराची रणनीती ठरेल. त्यानुसार भुजबळ यांच्या जिल्ह्यात सभा होतील, असेही डॉ. पवार यांनी नमूद केले.