नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर हल्लाबोल
नाशिक : आडगाव शिवारात प्रस्तावित आयटी पार्क प्रकल्पास चालना देण्यासाठी आयोजित परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माहिती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर आपल्या खास शैलीत हल्ले चढविल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी चकित झाले. राणे यांच्या भाषणास उपस्थित भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत गेला, तसे राणेंच्या भात्यातून वाग्बाण सुटत होते. आरोप आणि टीका संपल्यानंतर त्यांनी आयटी पार्कला सर्वेतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजपच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी हॉटेल गेट वे (ताज) येथे आयटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टीसीएस, इन्फोसिस, व्हिप्रो, केपीआयटीसारख्या दिग्गजांसह सुमारे १०० लहान-मोठय़ा आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले या आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी सभापती गणेश गिते आदी उपस्थित होते. पालिका आयुक्त कैलास जाधव कार्यक्रमास उपस्थित नव्हते. हा धागा पकडून नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
केंद्रीय मंत्री येणार असल्याने आयुक्तांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि बदलीच्या धास्तीने ते आले नसावेत. अलीकडच्या काळात नाशिकमधून अधिक राजकारण अधिक होत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. आयटी पार्क प्रकल्पाने नाशिकच्या प्रगतीला चालना मिळेल. परंतु, राणे येणार म्हणून लगेच राजकारण, विरोध सुरू झाला. तथापि आजतागायत विरोध करणारा एकही शिवसैनिक समोर आलेला नाही. राज्यात विकासाची भाषा होत नसून केवळ तोडफोडीची भाषा केली जाते. एन्रॉनला विरोध करणाऱ्या सेनेच्या मंडळींनी त्याच कंपनीची नंतर कंत्राटे मिळवली. अणुऊर्जा प्रकल्प होणाऱ्या नाणार परिसरात सेना नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. प्रकल्पास जागा देऊन ते पैसे कमावतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विकासाला विरोध करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. उद्योगांमध्ये कधीकाळी आघाडीवर असणारे महाराष्ट्र पिछाडीवर गेले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालयाकडून आपण राज्यात काही प्रकल्पांना चालना देण्यासाठी बैठक बोलावण्याबाबत दोन वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे. अडीच वर्षे शरद पवार यांच्या मेहेरबानीने ते मुख्यमंत्री राहिले. मुंबईतून मराठी माणसाला बाहेर पडावे लागले. तिथे उभारलेल्या इमारतीत सेनेचे लोक भागीदार बनले. राज्यातील अनेक मंत्री कारागृहाच्या वाटेवर आहेत. मुंबई महापालिकेतील स्थायी सभापतीच्या मालमत्तेची मोजणी १०० कोटींवर जात असल्याचे राणे यांनी सांगितले.
आयटी पार्कच्या पालकत्वाचे साकडे
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपचे झुंझार नेते असून कुठलेही काम त्यांनी हाती घेतले की ते तडीस नेतात. कुठल्याही अडचणींवर मात करून ते निकाल देतात. त्यामुळे आयटी पार्क प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी त्याचे पालकत्व राणे यांनी स्वीकारावे, असे आवाहन आ. देवयानी फरांदे यांनी केले.
दिशा सालियन प्रकरण खुले झाले तर..
दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा तपासाला खुले झाले तर सेनेला ते महागात पडेल, यात कुठला मंत्री आहे, ते समोर येईल. भिवंडीत ५०० एकर क्षेत्रावर उद्योगाचा प्रस्ताव आहे. नाशिक येथील आयटी पार्क प्रकल्प लवकर मार्गी लावला जाईल, असे राणे यांनी सांगितले. प्रारंभी, स्थानिक नेत्यांच्या लांबलचक भाषणावरून त्यांनी कानपिचक्या दिल्या. मुंबईहून नाशिकला येण्यास जितका वेळ लागला, तितका वेळ इथे भाषणे ऐकल्याचे ते म्हणाले.
दोन प्रकल्पांबाबत प्रशासन उदासीन
महानगरपालिकेच्या पुढाकारातून उभारले जाणारे हे देशातील पहिलेच आयटी पार्क ठरणार आहे. ३५० एकर क्षेत्रात साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पास जमीन देण्याची तयारी जागा मालकांनी दर्शविली. या प्रकल्पातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. या ठिकाणी महापालिकेची १५ एकर जागा आहे. तिथे सामाईक सुविधा केंद्र व आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. या प्रकल्पाने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. आयटी पार्क प्रकल्पाला चालना मिळाली असली तरी लॉजिस्टिक हब व अन्य एका प्रकल्पाविषयी प्रशासन उदासीन असल्याची तक्रार कुलकर्णी यांनी केली.
