जातीचे दाखले सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन येथे सुरू असून बुधवारी  समाजबांधवांनी सुरत- नागपूर महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवारी पहाटेपासून उपोषणकर्त्या महिलांसह पुरुषांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी, पुंडलिक सोनवणे, सुनीता कोळी, पुष्पा कोळी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून आडकाठी आणली जात असल्यामुळे बुधवारी २३ व्या दिवशी बांभोरी (ता. धरणगाव) येथील गिरणा नदीच्या पुलावर जिल्हाभरातील संतप्त समाजबांधव एकवटले. अखिल भारतीय कोळी समाजाचे प्रदेश सचिव अनिल नन्नवरे, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, रणरागिणी संघटनेच्या मंगला सोनवणे यांच्या नेतृत्वात ४२ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा >>> देवळ्यात शेत जमिनीच्या वादातून हाणामारी; तीन जखमी, १४ जणांविरुद्ध गुन्हा

आंदोलनामुळे धुळ्याच्या दिशेने पाळधीपर्यंत आणि जळगावच्या दिशेने खोटेनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, धरणगाव येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे, पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ, उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस अधिकाऱ्यांसमोर आंदोलनकर्ते प्रदेश सचिव नन्नवरे, मंगला सोनवणे यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. आंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी नन्नवरे, प्रा. सोनवणे, मंगला सोनवणे यांनी संवाद साधला. नन्नवरे म्हणाले की, उपोषणास आज २३ वा दिवस आहे. तरीही अजूनही निगरगट्ट शासनाकडून तोडगा काढण्यात येत नाही. आंदोलन मोडकळीस काढण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासनाकडून कुटील दबावतंत्र अवलंबविले जात आहे. उपोषणकर्त्यांचा जीव घेण्यापर्यंत शासनाची मजल जात आहे. समाजास न्याय देणार आहे का? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले न्यायहक्क समाजाला हवे आहे. आमची काहीही मागणी नाही. संविधानाने दिलेला न्यायहक्कच आम्ही मागत आहोत. प्रा. सोनवणे यांनी, मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक घेतली. तीत आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांचा साधा उल्लेखही केला नाही. मंत्र्यांना सर्वसामन्यांच्या समस्यांबाबत काहीही देणेघेणे नाही. फक्त मतांसाठी ते राजकारण करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. मंगला सोनवणे यांनी, दोन दिवसांत निर्णय न दिल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन राज्यासह जिल्ह्यात करण्यात येईल, असा इशारा दिला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दोन वाहनांमधून अटक करून तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आल

काही बसवरील स्टिकर फाडत निषेध

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसवर शासनाच्या विविध योजनांच्या जाहिरातींचे स्टिकर झळकविण्यात आले आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची छायाचित्रे आहेत. महामार्गावर रास्ता रोको आंदोलनप्रसंगी अनेक उभ्या बसवरील छायाचित्रांवर आंदोलनकर्ते प्रा. भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे यांच्यासह समाजबांधवांनी काळे फासत आणि काही बसवरील स्टिकर फाडत निषेध नोंदविला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal koli community protesters rastra roko in jalgaon district zws