जळगाव : जिल्ह्यातील अमळनेरमध्ये दोन पोलीस कर्मचारी गॅस भरणा केंद्र सुरू ठेवण्यासाठी सुमारे १२ हजार रूपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात अडकले. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली. या प्रकरणी दोन्ही पोलिसांसह खासगी पंटरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल राजेंद्र पाटील (३६) आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे (३३, दोन्हींची नेमणूक अमळनेर पोलीस ठाणे) आणि खासगी पंटर उमेश भटू बारी (४६), अशी लाच स्वीकारणाऱ्या संशयितांची नावे आहेत. तक्रारदार अमळनेर शहरातील धुळे रोड परिसरात पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमधून कॉम्प्रेशर यंत्राच्या साहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरणाचे केंद्र चालवतात. सदरचा व्यवसाय करत असताना अमळनेर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल पाटील तसेच जितेंद्र निकुंभे हे तक्रादाराकडे गेले. तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. अन्यथा, तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरण्याचा गुन्हा दाखल करतो, असे दोघांनी सांगितले. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ हजार रूपये लाचेची मागणी केल्यावर तक्रारदाराने मंगळवारी थेट धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी असता, पोलीस कर्मचारी अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १२ हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतरच्या सापळा कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी पाटील आणि निकुंभे हे तक्रारदाराकडून १२ हजार रूपये लाचेची रक्कम खासगी पंटर उमेश बारी याच्यामार्फत स्वीकारताना जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मागदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी धुळे येथील पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाई यशस्वी केली.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. या सर्व प्रकरणांमुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेली लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. त्यानंतर आता कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते पोलीस कर्मचारी सुद्धा लाच घेताना जाळ्यात अडकत असल्याने त्या विषयी नागरिकांमधूनही तीव्र चिंता व्यक्त होत आहे.