धुळे – ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्याच्या कारणावरून धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील अजंदे खुर्द येथे तुंबळ हाणामारी झाली. तलवार, कुर्‍हाड आणि सळईचा वापर झाल्याने तीन जण जखमी झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी २० जणांविरूद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अजंदे खुर्द येथील ग्रामसभेच्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर समाधान न झाल्याच्या कारणावरून गणेश माळी, ज्ञानेश्वर माळी, भूषण माळी, शशिकांत माळी, सुनील माळी, चेतन माळी, सुरेश माळी, प्रविण कोळी, किरण कोळी, संगीता माळी, प्रतिभा माळी आणि सकुबाई माळी यांनी उत्तम पाटील, जितेंद्र पाटील, योगेश्वर पाटील या तिघांवर हल्ला चढवला. जमावाने तलवार, कुर्‍हाड व सळईसह हल्ला चढवल्याने तिघेजण जखमी झाले.

यावेळी गणेश आणि ज्ञानेश्वर यांनी राजनंदिनी, हर्षदा यांच्या सायकलीला लाथा मारून त्या पाडल्या. यावेळी झालेल्या झटापटीत जितेंद्र पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चेन उत्तम पाटील यांच्या हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाली. प्रविण कोळी याने ग्रामसभेतील कागदपत्र भिरकावून दिली. तसेच खुर्च्यांना लाथा मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिसांनी सर्व १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या बाजूने गणेश माळी यानेही सरपंच राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, समाधान पाटील, आशिष पाटील, करण पाटील, योगेश पाटील व उत्तम पाटील यांच्याविरूद्ध फिर्याद दिली. ग्रामसभेत गणेश माळी यांनी संशयितांना शासनाकडून किती निधी आला, तो कुठे खर्च झाला, असे प्रश्न विचारल्याने तसेच प्रविण कोळी याने माहिती अधिकारात काही माहिती मागितल्याने मुदत पूर्ण होवूनही ती माहिती का देण्यात आली नाही, अशी विचारणा केली. यामुळे संतापलेल्या राजेंद्र पाटलांसह सर्व सात जणांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

हेही वाचा : सेनापती बापट रस्त्यावर १३ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा; पसार झालेल्या सुरक्षारक्षकाला राजस्थानातून अटक

राहत्या घरात प्रवेश करून प्रतिभा, मनिषा यांना मारहाण केली. प्रमिला माळी, प्रविण कोळी, आशा कोळी यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यावेळी गणेश माळी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील कडे गहाळ झाले. या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of sword ax in beating during village gramsabha dhule pbs
First published on: 27-01-2024 at 16:18 IST