पुणे : सेनापती बापट रस्त्यावर १३ वर्षांपूर्वी खून करून पसार झालेल्या सुरक्षारक्षकाला चतु:शृंगी पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. खून केल्यानंतर पसार झालेला आरोपी राजस्थानात चणे-फुटाण्यांची विकी करत असल्याचे उघडकीस आले आहे.
बिट्टी ऊर्फ श्यामबाबू छोटेलाल यादव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सेनापती बापट रस्त्यावरील अंबिका सोसायटीतील नियोजित गृहप्रकल्पात राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव आणि बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव सुरक्षा रक्षक होते. १५ मार्च २०११ रोजी रात्री अकराच्या सुमारास सिक्युरिटी एजन्सीतील पर्यवेक्षक बाबुराव मोघेकर तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याशी दोघांचा वाद झाला.
दोघांनी मोघेकर यांचा खून केला. त्यानंतर श्यामबाबू यादव पसार झाला होता. श्यामबाबू उत्तरप्रदेशातील चित्रकुट जिल्हयातील आहे. चतु:शृंगी पोलिसांचे पथकचित्रकुटमधील पहाडी गावात गेले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक तपासात तो राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे समजले.
पोलीस पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो राधेश्याम नावाने तेथे वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. झालवाड परिसरात तो चणे-फुटाणे विक्री करून उदरनिर्वाह करत होता.
हेही वाचा : बालेवाडी परिसरातील वेश्या व्यवसायावर छापा, सात राज्यातील दहा मुलींची सुटका
चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने, अस्लम अत्तार, गोकुळ घुले यांनी ही कामगिरी केली.