जळगाव : नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे स्वागत आणि बदली झालेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निरोपाचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री पाटील यांनी विशेषतः माजी जिल्हाधिकाऱ्यांवर स्तुती सुमने उधळल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या कामात सदैव तत्पर राहुन सर्व सामान्यांची कामे करणारा आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद, अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी मावळते जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी कामात सर्वांना सामावून घेऊन काम केले पाहिजे. आयुष प्रसाद यांनी महसूल विभागासोबतच पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासन यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले. वडाचे झाड कितीही मोठे असले तरी त्याच्या पारंब्या जमिनीतच असतात. त्या प्रमाणेच प्रसाद यांनी आपल्या पदाचा गर्व न करता जमिनीवर राहूनच सर्वांची कामे केले. सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजे, अशी त्यांची कायम तळमळ असे. त्यांनी गरीब आणि गरजूंची कामे प्राधान्याने केली. त्यांच्या कामाची शैली अतिशय उत्तम होती. ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, अशी स्तुती पालकमंत्री पाटील यांनी केली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पोलिसांना नवीन चार चाकी वाहने, बीटवरील पोलिसांना दुचाकी उपलब्ध करून देण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी आणि सर्व आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी काम करून जे कोणी जिल्हाधिकारी गेले आहेत, त्यातील बरेच अधिकारी पुढे राज्याचे मुख्य सचिव झाल्याचा उल्लेख देखील पालकमंत्री पाटील यांनी केला. माझे मन सांगते आहे की, आयुष प्रसाद हे सुद्धा एक दिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील. त्यांची कार्यशैली आणि त्यांनी घेतलेली मेहनत, सर्व राजकीय पक्षांशी असलेले चांगले संबंध, काम करताना मनात कधीच अहंकार न बाळगणे, या गोष्टी त्यांना नक्कीच पुढे घेऊन जातील. यापूर्वी सुद्धा बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामे केली आहेत. काम करताना मन स्वच्छ असले तर यश नक्की मिळते, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निरोप आणि नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत, या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, इंद्रायणी मिश्रा आदी उपस्थित होते. निरोप समारंभात मनोगत व्यक्त करताना आयुष प्रसाद म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात काम करताना खूप चांगले अनुभव आले. सर्व लोक माझे आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. या जिल्ह्यातून भरपूर शिकायला मिळाले. आपण ज्याप्रमाणे मला कामात वेळोवेळी मदत केली, त्याप्रमाणेच नवीन जिल्हाधिकारी घुगे यांना मदत करा. माझ्या निरोप समारंभापेक्षा नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप समारंभ निश्चित मोठा असेल.
दरम्यान, नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रत्येक वेळी निरोप समारंभ होत नसतो. तो आपल्या कामामुळेच आपल्याला दिला जातो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी केले. तर आभार उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी मानले.