नवी मुंबई: सिडकोच्या अतिक्रमण पथकाला येऊ न देण्यासाठी थेट जेसीबी लावून रस्ता अडवणाऱ्या शंभरपेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे विचुंबे, ता. पनवेल येथील नैना अधिसूचित क्षेत्रात गट क्र. २३५ या ठिकाणी बांधलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक गेले असता हा प्रकार घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतप्त जमाव तसेच सिडको अतिक्रमण पथकाच्या विरोधातील रोष पाहून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोहीम स्थगित करावी लागली. बळीराम पाटील, राजेश केणी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, वामन शेळके, सुभाष भोपी व इतर सुमारे १०० व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी बाराच्या सुमारास सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक पोलीस बंदोबस्तासह मौजे विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड येथील नैना अधिसूचित क्षेत्रात पोहोचले.

मोहिमेला अटकाव करणाऱ्यांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. येथील गट क्र. २३५ या बळीराम पाटील व इतर यांच्या मालकीच्या जमिनीवर विकासक अच्छेलाल यादव, रमेश वाघमारे यांनी अंदाजे १ हजार चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहीम राबवण्यासाठी सिडकोने गुरुवारी प्रचंड पोलीस फौजफाटा नेला होता.

विचुंबे गावाकडे जाणाऱ्या पुलावर राजेश केणी (रा. सुकापूर, ता. पनवेल), शेखर शेळके (रा. आदई), बळीराम पाटील (रा. विचुंबे, ता. पनवेल), वासुदेव भिंगारकर (रा. विचुंबे,), वामन शेळके (रा. मोहपाली, ), सुभाष भोपी (रा. रिटघर दुद्रे,) यांच्यासह अंदाजे १०० लोकांचा जमाव जमला होता.

जमावाकडून पथकाला धमकी

या जमावाने सिडको पथकाचा रस्ता जेसीबी आडवा लावून अडवला. त्या वेळी सिडको पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ‘आम्ही तुम्हाला नैनामध्ये पाय ठेवू देणार नाही, पुढे जाऊ देणार नाही. आमचे जेसीबी येथे आहे’, अशी धमकी दिली. तसेच मागच्या आठवड्यात तुमच्या अधिकाऱ्यांना हरिग्राम येथून आम्ही हाकलून दिले आहे. नैनामध्ये पाय ठेवाल तर ठार मारू अशी धमकी दिली आहे. जमावाने तुमच्या जिवाचे बरेवाईट केले तर त्याची जाणीव ठेवा असे म्हणून आक्रमकपणे बोलू लागले. तुम्ही हे बांधकाम कसे तोड़ता हे आम्ही बघतो, असे म्हणून जीविताला धक्का पोहोचवण्याची धमकी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against more than hundred people who blocked the road to prevent the encroachment team of cidco in navi mumbai dvr