नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही मात्र ओबीसी मधून आरक्षण दिल्याने आता ओबीसी आक्रमक झाले असून शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातही नवी मुंबईतील शेकडो ओबीसी समाजाचे लोक आज सकाळपासून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.

मराठा समाजाने अनेक वर्ष आरक्षण मागणीसाठी आंदोलने केली. गेल्याच्या महिन्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन वेळी ज्या मराठा समाजाची नोंद हैद्राबाद गॅजेट नुसार कुणबी आहे. त्यांना ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ घेता येईल असा निर्णय राज्य शासनाने घेतला. या महत्वाच्या निर्णयाने मराठा आंदोलन शमले. मात्र हे आंदोलन शमताच या निर्णयाच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला . राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय व हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी यामुळे कुणबी समाज आक्रमक झाला .

आज याच प्रकरणी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे.  आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कोकणातले कुणबी समाज वाशी रेल्वे स्टेशन वरून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे  या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, मोठ्या संख्येने समाज बांधव हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला ताकद दाखवणार आहेत.

याबाबत नवी मुंबईचे माजी उपमहापौर आणि कुणबी समाजाचे नेते अविनाश लाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आज या मोर्चात सामील होण्यासाठी नवी मुंबईतील हजारोंच्या संख्येने कुणबी समाजातील लोक सामील होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र अचानक हैद्राबाद गॅजेट नोंद ग्राह्य धरून मराठा समजला कुणीबीतून आरक्षण दिल्याने आमच्या हक्कावर गदा आली आहे. शासनाच्या या निर्णयाच्या  विरोधात आम्ही हा मोर्चा काढला आहे.

चौकट : हैद्राबाद संस्थानात महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील तत्कालीन सात जिल्ह्यांचा समावेश होता. हैद्राबाद संस्थान खालसा झाल्यावर या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्रात केला गेला. मात्र तत्पूर्वी हैद्राबाद गॅजेट मध्ये अनेक मराठा समाजातील लोकांची नोंद कुणबी म्हणून झाली आहे. हाच धागा पकडून ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या कुणबी समाजाचे आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. त्यामुळे अन्य कुणबी समाजाला प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची भावना असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.