नवी मुंबई – नवी मुंबई येथील ऐरोली शहरात असलेल्या एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने शिक्षिकेमुळे आत्महत्या केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आला होता. परंतू, अद्यापही त्या शिक्षिकेवर आणि शाळा प्रशासनावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थीनीच्या कुटूंबाची भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी विद्यार्थीनीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या शिक्षिकेसह शाळा प्रशासनावर दोन दिवसात गुन्हा दाखल करुन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
ऐरोलीतील एका बड्या शाळेत ही विद्यार्थीनी इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेत सहामाही परीक्षा सुरु असताना या विद्यार्थीनीच्या बाकड्याखाली शिक्षिकेला चिट्ठी सापडली. कोणतीही खात्री अथवा चौकशी करण्याऐवजी ती कॉपी करत असल्याचे सांगत शिक्षिकेने तिला सर्वांदेखत अवमानकारक भाषा वापरली. तिच्या आर्थिक परिस्थितीवरून जातिवाचक भाषा त्या शिक्षिकेने वापरली. संपूर्ण शाळेत तिला सर्वांसमक्ष फिरवून तिची बदनामी केली गेली. हा अपमान सहन झाली नसल्यामुळे १६ वर्षीय या विद्यार्थीनीने मानसिक तणावाखाली जाऊन आत्महत्या केली.
आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. शिक्षिकेच्या अपमानास्पद वागणुकीमुळे या कोवळ्या जीवाने टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. अनुष्काच्या कुटुंबियांची खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेऊन सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
पोलीस आणि शाळा प्रशासनाने शिक्षिकेवर कोणतीच कारवाई केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी पालकांसमक्ष पोलीस आयुक्त मिलिंद भामरे, उपायुक्त पंकज दहाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली. सदर घटनेची गंभीर चौकशी करून ॲट्रॅासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
पोलीसांनी २ दिवसांत कारवाई करण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना आश्वासन दिले. शिवसेना (शिंदे गट) तर्फे संबंधित शाळा व्यवस्थापनाला निवेदन देऊन शिक्षिकेची तात्काळ निलंबनाची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना केली आहे. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही आवाज उठवत राहू, अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी पालकांना दिली.