नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेला स्वतःची “पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था” स्थापन करण्यास राज्याच्या नगरविकास विभागाकडून मान्यता प्राप्त झाली असून, या संस्थेसाठी एकूण १०५ नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व पदांसाठी लागणारा संपूर्ण खर्च महानगरपालिका स्वतःच्या निधीतून उचलणार आहे. यामाध्यमातून महापालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षण घेणे सोपे होणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सध्या सार्वजनिक रुग्णालय वाशी (३०० खाटा), नेरूळ (२८० खाटा), ऐरोली (२०० खाटा) तसेच बेलापूर, तुर्भे आणि कोपरेखैरणे येथील माता-बाल रुग्णालये (५० खाटा) व २३ नागरी आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या रुग्णालयांद्वारे नागरिकांना विविध उपचार सेवा पुरविल्या जातात आणि केंद्र तसेच राज्य शासनाचे अनेक आरोग्यविषयक कार्यक्रम राबविले जातात. वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय हे महानगरपालिकेचे सर्वात मोठे आरोग्य केंद्र असून, नवी मुंबईसोबतच पनवेल, उरण, ठाणे व मानखुर्द परिसरातील रुग्णदेखील येथे उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता त्याचबरोबर येत्या काळात दहिसर भागातील १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या सेवांवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी, तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी अधिकाधिक कुशल व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत या उद्देशाने महानगरपालिकेने स्वतःची “पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था वैद्यकीय महाविद्यालय (एमबीबीएस शिक्षण देणारी) नसून, आधीच वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या (एमबीबीएस) डॉक्टरांना पुढील उच्च शिक्षण जसे की वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (एम.डी.), शल्यचिकित्सा पदव्युत्तर पदवी (एम.एस.) किंवा इतर विशेष तज्ज्ञ अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था असेल. त्यामुळे नवी मुंबईतच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टरांना पुढील शिक्षण व प्रगत प्रशिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या संस्थेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अनुमतीपत्र, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून आवश्यकतापत्र तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून संलग्नतेसाठी संमतीपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रांनंतर महानगरपालिकेने नव्याने १०५ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून याला मान्यता देण्यात आली असून याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार या पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेचा संपूर्ण खर्च महानगरपालिकेकडूनच भागविण्यात येणार आहे. या संस्थेमुळे राज्य शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही. तसेच हा खर्च शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला नवे परिमाण लाभणार आहे. भविष्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टरांची उपलब्धता वाढेल, आधुनिक उपचारपद्धतींचा विकास होईल आणि नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळतील.

या शिक्षण संस्थेत वैद्यकीय अधिष्ठाता, तसेच औषध, अस्थिव्यंग, बालरोग, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग, सामान्य शल्यचिकित्सक, त्वचा, मानसोपचार, क्षयरोग, नेत्ररोग, कान-नाक -घसा, ए.एम.एस. यातील प्राध्यापक तसेच इतर सहयोगी प्राध्यापक आणि इतर महत्वाच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.