पनवेल – सत्तेत असूनही कामोठ्यातील नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले! “पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी बेलापूर सिडको भवन बुधवारी दणाणून गेले. भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी सिडकोविरोधात तीव्र संताप व्यक्त करत पाणीपुरवठ्याच्या अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी केली.

“या सिडकोचे करायचे काय… खाली डोके वर पाय!” अशा आक्रमक घोषणांनी सिडको भवनाचा परिसर बुधवारी हादरला. कामोठे परिसरातील पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात संतप्त नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चा घेऊन धडकले. महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या आंदोलनात लोकांचा आक्रोश स्पष्टपणे दिसत होता.मोर्चेकऱ्यांचा वाढता जमाव पाहून सिडको प्रशासनाने प्रवेशद्वार तातडीने बंद केले.

सिडकोचे सुरक्षारक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्ते “सिडको अधिकारी खाली या” अशा जोरदार घोषणांनी ठिकाण गाजवत राहिले.शेवटी सिडकोच्या दक्षता विभाग प्रमुख सुरेश मेंगडे आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी माजी नगरसेवक विकास घरत, भाजपचे रविंद्र जोशी यांच्यासह प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी बोलावले. बैठकीत “मंजूर मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करा”, “गळती व दूषित पाणी रोखा”, “कमी दाबाचा प्रश्न सोडवा” अशा मागण्या नागरिकांनी ठामपणे मांडल्या.चर्चेनंतर सिडको प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. कामोठेतील जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू असल्याने काही विलंब होत असला तरी पाणीपुरवठा स्थिर करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी चार सदस्यीय तपास पथक जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणार असून, दररोजच्या पाणीपुरवठ्याची नोंद जलमापकावर ठेवण्याचे आदेश डॉ. दयानिधी यांनी दिले.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात सत्तेत असूनही रस्त्यावर उतरावे लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुका काही महिन्यांवर असताना, “ सिडको वसाहतींचा पाणी प्रश्न” हा मुद्दा आता निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत