पनवेल : धाडसी नागरिकाच्या सतर्कतेमुळे खारघरमध्ये रंगेहाथ चोरट्याला पकडण्यात नागरिकांना यश आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी खारघर उपनगरातील शिल्प चौक येथे सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या घटनेमुळे वाहनाची काच फोडून चोरी करणा-या टोळीचा शोध लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कामोठे येथील सेक्टर १८ येथे राहणारे ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिक हे त्यांच्या मजूराचे वेतन देण्यासाठी बॅंकेतून रोख रक्कम काढून खारघर उपनगराच्या दिशेने त्यांच्या वाहनातून जात होते. यावेळी त्यांचा मित्र त्यांच्यासोबत होता. या दरम्यान एका दुचाकीवरून अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय त्यांना आला.
हा धाडसी बांधकाम व्यावसायिक घाबरून न जाता त्याने खारघर येथील शिल्प चौक येथील छत्रभूज इमारतीशेजारी त्यांचे वाहन थांबून पाणी पुरी खाण्यासाठी उतरले. या दरम्यान त्यांचा पाठलाग करणारा संशयीत सुद्धा उभ्या वाहनापासून हाकेच्या अंतरावर थांबला. अखेर अवघ्या पंधरा मिनिटात स्वताच्या वाहनावर लक्ष्य ठेवून पाणी पुरी खाऊन वाहनात बसत असताना बांधकाम व्यावसायिकाच्या वाहनाची काच स्क्रुड्रायव्हरच्या साह्याने फोडून वाहनातील रोख रकमेची पिशवी घेऊन जात असताना बांधकाम व्यावसायिक व त्याच्या मित्राने तरूण चोरट्यावर झडप मारली. या हातापायीमध्ये तो चोरटा जमीनीवर पडला. बांधकाम व्यावसायिक व त्याच्या मित्राने त्या चोरट्याला पकडून आरडाओरड सुरू केली. जमलेल्या जमावाने सुद्धा या चोरट्याला पकडून ठेवण्यात मदत केली. काही मिनिटांत नवी मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर पोलीसांचे बीट मार्शल घटनास्थळी लगेच पोहचले. बांधकाम व्यावसायिकाच्या वाहनामध्ये पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जाण्यासाठी रंगेहाथ नागरिकांनी पकडण्याची खारघरमधील ही पहिलीच घटना आहे.
विशेष म्हणजे ९ सप्टेंबरला ( गेल्या आठवड्यात मंगळवारी) रात्री साडेनऊ वाजता गोवा मुंबई महामार्गावर पनवेल येथील पेठगावाशेजारील वेलकम हॉटेलबाहेर वाहन उभे करून प्रवासी मंडळी जेवणासाठी हॉटेलात गेली. अवघ्या १५ मिनिटांत चोरट्यांनी वाहनाची काच फोडून वाहनातील पिशवीमधून सव्वाचार लाखांचे दागीने चोरी केल्याची घटना ताजी असताना काचफोडून चोरी कऱणारा एक चोरटा खारघर पोलिसांना नागरिकांनी पकडून दिला.
खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरखडे यांच्याकडे सोपवला आहे. या प्रकरणातील संशयीत चोरट्याला बुधवारी दुपारी पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या चोरट्याने अजून किती ठिकाणी या पद्धतीच्या चो-या केल्या, याची चौकशी पोलीस करत आहेत.