मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात शुक्रवारी देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सीताराम शिंदे यांनी या हंगामातील पहिले उत्पादन, दोन डझनाची पहिली पेटी एपीएमसी व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. आज बाजारात दाखल झालेल्या पेटीची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून याला ९ हजार रुपये दर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वैद्यकीय महाविद्यालय भूखंड प्रकरणी भाजप आमदार मंदा म्हात्रेंचे आंदोलन रद्द

दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा मार्च महिन्यात सुरू होतो. यंदा पाऊस लांबल्याने हंगाम उशिराने सुरू होईल. आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुरळक आवक होईल परंतु खरा हंगाम हा १५ मार्चनंतरच सुरू होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. परंतु या हंगामातील पहिली पेटी आज शुक्रवारी बाजारात दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले होते. देवगड येथील या शिंदे कुटूंबियांच्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टपासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र ऊन पावसाच्या तडाख्यात काही कलमांवरील मोहर गळून पडला. त्यापैकी चार ते पाच कलमांवरील मोहर टिकवण्यासाठी मेहनत घेऊन हापूसचे पाहिले उत्पादन घेतले आहे. हीच हापूसची पहिली पेटी एपीएमसी बाजारात दाखल झाली आहे. परंतु हापूसची अवीट गोडी चाखण्यासाठी खवय्यांना दोन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.

हेही वाचा- VIDEO ‘मराठी गाण्यांचीही फर्माईश पूर्ण करा’; नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा हॉटेल मालकांना मनसेचा दम; एकाला दिला चोप

शनिवारी परदेशी मलावी हापूसचेही आगमन होणार

शुक्रवारी एपीएमसी बाजारात देवगड हापूसची पहिली खेप म्हणजेच हंगामातील पहिली पेटी बाजारात दाखल झाली असून त्या पाठोपात शनिवारी बाजारात परदेशी आफ्रिकन मलावी हापूस दाखल होणार आहे. व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे हा परदेशी मलावी हापूसचे ८०० बॉक्स दाखल होणार आहेत. एक बॉक्स ३ किलोचा असून यामध्ये ९-१६ नग असून ऐका बॉक्सला अंदाजित ४ ते ५ हजार रुपये अपेक्षित आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: एपीएमसीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली, गोडवा मात्र कमीच

देवगड येथील कातवणमधील बागायतदार शिंदे यांनी एपीएमसी मध्ये यंदाच्या हंगामातील हापूस ची पहिली दोन डझनाची पेटी बाजारात आमच्या पेटीवर पाठवण्यात आली असून त्याला नऊ हजार रुपये दर मिळाला आहे हा या यंदाच्या हापूसंगामातील ही पहिलीच पेटी असल्याने सालाबाद प्रमाणे यंदाही पहिली पेटी सिद्धिविनायकच्या चरणी अर्पण करण्यात येत आहे यंदा पाऊस चांगला झाल्याने हापूस हंगाम उत्तम जाणार आहे, अशी माहिती एपीएमसीतील व्यापारी अशोक हांडे यांनी दिली.

आफ्रिकेतील ‘मालावी आंबा’ मुंबईत दाखल

पुणे : आफ्रिकेतील ‘मालावी आंबा’ नवी मुंबईच्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी दाखल झाला. १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याची आवक होत राहील. घाऊक बाजारात या आंब्याच्या तीन किलोच्या पेटीचा दर साधारणपणे चार ते पाच हजार रुपये आहे. आफ्रिकेतील मालावी देशातून नवी मुंबई बाजार समितीत शुक्रवारी तीन किलोच्या ८०० पेटय़ांची आवक झाली. १५ डिसेंबरपर्यंत सुमारे दहा हजार पेटय़ांची आवक मुंबईत होईल. इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतूक महाग झाली आहे. त्याचबरोबर आयात आणि अन्य करांमुळे आंब्याचे दर वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे संचालक आणि आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

मालावी आंबा तीन किलोच्या पेटय़ांमधून आला आहे. तीन किलोच्या एका पेटीची किंमत चार ते पाच हजार रुपये असूनही चांगली मागणी असल्यामुळे एका दिवसातच सर्व पेटय़ांची विक्री झाली, असेही पानसरे यांनी सांगितले. आयात वाढल्यानंतर हा आंबा मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, बेळगाव येथील बाजार समितीत पाठविला जाणार आहे. देवगड हापूसला ज्या ठिकाणी मागणी असते, त्या ठिकाणी हा आंबा पाठविण्याचे नियोजन आहे. या आंब्याला अमेरिका, आखाती देश आणि मलेशियात मोठी मागणी असते, त्यामुळे त्याचे दर कायमच चढे असतात, असेही पानसरे म्हणाले.  वाशीच्या बाजार समितीत २०१८ मध्ये प्रथम ४० टन मालावी आंबा आयात करण्यात आला होता. २०१९ मध्ये सुमारे ७० टन आंबा आला आणि २०२० मध्ये करोना साथीमुळे प्रतिपेटी सुमारे ३००० रुपये दराने फक्त १५ टन आंबा आयात करण्यात आला होता.

‘मालावी’चे मूळ रत्नागिरीत..

मालावी आंब्याचे मूळ रत्नागिरीतील दापोलीत आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वी दापोलीतून रत्नागिरी हापूसच्या लहान फांद्या (काडय़ा) मालावी देशात कलम करण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. तेथे सुमारे ४०० एकरावर हापूसची लागवड करण्यात आली. पुढे क्षेत्रवाढ होऊन आता हजारो हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. या आंब्याला ‘मालावी हापूस’ असेही म्हटले जाते.

कोकणातील हापूसशी स्पर्धा नाही..

मालावी आंब्याचा हंगाम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असतो. डिसेंबरमध्ये मालावीत पाऊस सुरू होतो, त्यामुळे आयात थांबते. मालावीच्या हंगामात देवगड हापूस बाजारात नसतो. त्यामुळे देवगड हापूस आणि मालावी हापूस यांच्यात कोणतीही स्पर्धा होत नाही. कोकणातील आगाप (पूर्व हंगामी) हापूस जानेवारी ते फेब्रुवारीत किरकोळ स्वरूपात बाजारात येतो. मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासूनच खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devgad hapus alphonso mangoes in apmc market from katvan villege dpj
First published on: 25-11-2022 at 14:54 IST