Navi Mumbai International Airport 2025 Launch देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांचं मी महाराष्ट्राच्या भूमीत स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. तसंच इतर भाषणंही झाली.
एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण करत असतो. आठ वर्षांपूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं त्याचं आज लोकार्पण होतं आहे. मोदींचा हात लागतो त्या गोष्टीचं सोनं होतं हे आपण पाहतो. २०१४ मध्ये मोदींनी जो टेकऑफ केलं आहे ते भारताला महासत्ता करण्यासाठीच. प्रगती आणि विकास बरोबर येतात. उड्डाण म्हटलं की आम्हाला मोदी आठवतात असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दक्षिण मुंबईला जोडणारी मेट्रो आता सुरु होते आहे
मी आज आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो की एअरपोर्टची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करत आहेत. पण लवकरच लंडनचे लोक हिथ्रोची तुलना नवी मुंबईशी करतील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच भुयारी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गाने दक्षिण मुंबईशी जोडणारी मेट्रो ही उत्तम उदाहरण आहे. दोन ते चार वर्षांत सगळ्या मेट्रो सुरु होतील. हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करु शकते असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीने लावलेले स्पीड ब्रेकर आपण उखडून टाकले-एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीने समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इतर सगळ्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर लावले होते. पण २०२२ सगळे स्पीडब्रेकर उखडून टाकले. त्यानंतर राज्याचा विकास होतो आहे. आज आपला शेतकरी म्हणजेच बळीराजा संकटात आहे. या पूरग्रस्तांसाठी आपल्या सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केला. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा शब्द आम्ही पाळला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. २०१४ पर्यंत काँग्रेसने महाराष्ट्राच्या फक्त २ लाख कोटी दिले होते मात्र मागच्या दहा वर्षांत मोदींनी १० लाख कोटींचा निधी महाराष्ट्राला दिला. काँग्रेसचं करप्शन फर्स्ट आणि मोदींचं नेशन फर्स्ट हे आपण पाहिलं आहे. विकास की एकमेव आंधी इसका एकमेव कारण नरेंद्र मोदी असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.