नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन मोठया धुमधडाक्यात पार पडल्यानंतर या विमानतळापासून आठ ते दहा किलोमाटर अंतरावर असलेल्या आणि फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचे मुख्य केंद्र ठरलेल्या डीपीएस तसेच इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षीत करु नये अशास्वरुपात सविस्तर प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला पाठविला आहे. परंतू, सिडकोच्या या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून डीपीएस तलाव संरक्षित केले नाही तर, तलावात उतरुन आंदोलन करु असा इशारा पर्यावरणप्रेमींनी सिडकोला दिला आहे.

पामबिच मार्गालगत नेरुळ येथे असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) नजीकचा तलाव आणि आजूबाजूचा पाणथळींचा परिसर फ्लेमिंगोंसह असंख्य स्थलांतरित पक्षांचा अधिवास बनला आहे. या पक्ष्यांच्या संचारामुळे नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीची ओळख मिळाली आहे. परंतू, शहरातील सरकारी यंत्रणांकडून वारंवार या पाणथळी हटविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हा तलाव आणि आजूबाजूच्या परिसरातील भूखंडाची विक्री करण्यासाठी सिडकोकडून हालचाली सुरुच आहेत.

एकीकडे ‘पाम बिच’ मार्गावर असणारा डीपीएस शाळेलगतचा तलाव राज्य सरकारने फ्लेमिंगो संरक्षीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तर, दुसरीकडे यामुळे विमानांच्या उड्डाणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भीती सिडकोने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, विमानतळाचे कारण पुढे करत असताना सिडकोने हा भूखंड फ्लेमिंगोसाठी संरक्षीत झाल्यास सध्याच्या बाजारभावानुसार ३६०० कोटी रुपयांच्या महसूलास मुकावे लागेल, हे मान्य केले आहे. सिडकोने डीपीएस तसेच इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षीत करु नये अशास्वरुपात सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. याप्रकारावरुन आता पर्यावरण तज्ज्ञ तसेच पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

पर्यावरण तज्ज्ञ बी एन कुमार यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यातच डीपीएस तलावाला राज्य सरकारकडून संरक्षित क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. तरी देखील सिडकोकडून या भूखंडाची विक्री करण्याच्या हालचाली सुरु आहेत. ज्यावेळी विमानतळाच्या निर्मितीचे काम सुरु होणार होते त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणाला तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासा कुठेही धक्का बसणार नाही असा अहवाल देण्यात आला होता. सध्याच्या काळात जैवविविधतेची गरज असतानाही सिडकोकडून अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे हे खूप दुदैव आहे, अशी भावना बी एन कुमार यांनी मांडली.

तर, नवी मुंबई शहराला फ्लेमिंगोने निश्चितच एक जागतिक स्तरावर ओळख करून दिलेली आहे. नवी मुंबईला केवळ महाराष्ट्रात किंवा देशभरात नाही तर, जगभरात फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते आणि या ठिकाणी फ्लेमिंगो बरोबर जगभरातली विविध पक्षी स्थलांतरित होऊन येत असतात. परंतू, आता विमानाच्या झोनमध्ये फ्लेमिंगो येतील असे फुटकळ कारण सिडको पुढे करुन या भूखंडाचा सौदा करत असेल तर यांना नगारकि म्हणून आम्ही पूर्ण विरोध करू, असे मत पर्यावरणप्रेमी समीर यांनी मांडले. विमानतळ जेव्हा येण्याचा घाट घातला जातो.

तेव्हा ज्या काही परवानग्या बघितल्या जातात, त्याच्यामध्ये विमानाचा उडण्याचा झोन फ्लाईंग झोन तिथे असलेल्या पक्षांचा झोन याचा अभ्यास करून आधीच सगळे रिपोर्ट सादर केले जातात. आणि हा सर्व अहवाल सादर करण्यात आला होता. मग, आता पक्षांच्यामध्ये विमान येतील असे कारण सिडको का पुढे करत आहे. पुन्हा जर सिडको भूखंड विकण्याचा प्रयत्न करत असेल तर, याआधी जसे नागरिकांनी सातत्याने पाण्यात उतरुन आंदोलन केली आहेत. त्याचपद्धतीने यावेळी सुद्धा सिडकोला जाग येण्यासाठी नागरिकण आणि पर्यावरणप्रेमी पाण्यात उतरुन आंदोलन करतील असा इशारा समीर यांनी दिला आहे.