नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच नवी मुंबईत ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ भरवून मतदार यादीतील घोळांचा पर्दाफाश केला होता. या प्रदर्शनातून मतदार नोंदणीतील गंभीर चुका जनतेसमोर आल्याने निवडणूक अधिकारी आणि प्रशासनावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. परंतु या सगळ्या घोळांनंतरही नवनवीन घोळ समोर येणे सुरूच आहे. ताज्या घटनेत बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल ५७ मतदारांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक ३६६ मध्ये हे ५७ मतदार एकाच पत्त्यावर म्हणजेच घर क्रमांक म्हणून महानगरपालिकेचे बेलापूर वॉर्ड ऑफिस नोंदवले गेल्याचे आढळले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंद एका सरकारी कार्यालयाच्या पत्त्यावर झाल्याने मनसेने या प्रकरणाची तपासणी सुरू केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वॉर्ड ऑफिसला भेट देऊन ‘हे मतदार प्रत्यक्षात येथे राहतात का?’ याची खातरजमा केली. मनसेच्या पाहणीत वॉर्ड ऑफिसमधील सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि लिपिक यांनी एकमुखाने, या ५७ मतदारांपैकी कोणीही या कार्यालयात राहत नाही. असे सांगितले. या धक्कादायक कबुलीनंतर मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर टीकास्त्र सोडताना, “अधिकारी झोपेत असताना मतदारांची नोंदणी केली का?” असा संतप्त सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसेने उपरोधिक टोला लगावत, निवडणूक अधिकाऱ्यांचा ‘शाल-श्रीफळ देऊन सत्कार’ करण्याची घोषणा केली आहे. “रोज नवनवीन प्रताप करून लोकशाहीला गोंधळात टाकणाऱ्या या अधिकाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे,” असे उपहासात्मकपणे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशी येथे भरवलेल्या ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ या उपक्रमाने शहरात खळबळ उडवली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “हे केवळ प्रदर्शन नाही, तर प्रत्येक मतदाराच्या गालावरची चपराक आहे,” असे वक्तव्य केले होते.
नवी मुंबईतील मतदार याद्यांच्या घोळात महापालिका आयुक्तांच्या घराच्या पत्त्यावर नोंदलेले मतदार, शौचालयाच्या पत्त्यावर असलेली नावे, मृत व्यक्तींची नावे, गुजराती भाषेतील मतदार, घर क्रमांक ‘शून्य’ असलेली नावे, एकाच घरात अनेक मतदार असणे तसेच एका मतदाराचा पत्ता चक्क मुंबई महापालिका असा असल्याचेही समोर आले होते. इतकेच नव्हे, तर शहरातील धार्मिक स्थळावरही मतदारांची नोंद झाल्याचे या प्रदर्शनात उघड झाले होते. आता वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर ५७ मतदार सापडल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनसेने या प्रकरणी पुढील टप्प्यात निवडणूक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर औपचारिक तक्रार दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, “मतदार यादीतील गोंधळ थांबवला नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
