नवी मुंबई : घणसोलीतील गवळीदेव डोंगरावर पर्यटनस्थळ निर्माण करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पात वृक्षतोड अथवा निसर्गाला हानी होईल असे कुठलेही काम केले जाणार नाही असा दावा मनपाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात या डोंगरावर चारचाकी गाडी जाईल असा रस्ता बनवण्यासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे. आता ट्रॅक्टर डंपरसारखी वाहने कामानिमित्त डोंगरावर जात असल्याने हा रस्ता तयार करण्यासाठी किती झााडांचा बळी गेला असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात आहे.

नवी मुंबईतील घणसोली एमआयडीसी भागात गवळीदेव नावाने प्रसिद्ध डोंगर आहे. या ठिकाणी गवळीदेव गणपतीची मंदिर डोंगर माथ्यावर आहेत. एकेकाळी या डोंगरावर झाडे अत्यल्प होती. मात्र १९८४ सालापासून नोसिल कंपनी व्यवस्थापनाने येथे देशी झाडांची लागवड सुरू केली. सुबाभूळ, चिंच, पिंपळ, वड, जांभूळ, असे लाखो झाडांची लागवड करण्यात आली. सुमारे साडेचार लाख झाडे या डोंगरावर लावून त्याची निगराणी व्यवस्थित केल्याने आज या ठिकाणी गर्द वनराई दिसून येत आहे. याच ठिकाणी दोन धबधबे असून पावसाळ्यात मुंबई उपनगरे, ठाणे, डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई परिसरातील लोक पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून भेट देतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने हळू हळू करीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. आज अर्धे झाडेही राहिले नाहीत असा दावा केला जात आहे.

गेल्या दीड वर्षांपासून नवी मुंबई महानगर पालिकेकडून पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या नावाखाली पर्यटनप्रेमींना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीही नेमके काम काय सुरू आहे या उत्सुकतेपोटी ऐरोली येथे राहणारे हनुमंत निकम हे पाहण्यास गेले असता काही बाबी उघड झाल्या. या ठिकाणी पायवाट वर चारचाकी गाडी जाईल असा रस्ता बनवण्यात आला आहे. पूर्वी केवळ पायी डोंगरावर जात येत होते. आता ट्रॅक्टर डंपर जाऊ लागले आहेत. शेकडो वृक्ष तोडून खड्डा करून त्यात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हा डोंगर मोठ्या प्रमाणात उजाड झाला आहे. असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट परिस्थितीचे छायाचित्र दाखवले व योग्य ती दखल घेण्याची मागणी केली आहे. गवळी देव डोंगर पर्यटन क्षेत्र विकास करताना नियम पाळले जात आहेत. याशिवाय जेवढ्या झाडांना नुकसान होईल त्यापेक्षा अधिक झाडे लावून त्याचे संगोपन केले जाणार असून तसे निविदेत नमूद आहे. अशी माहिती अभियांत्रिकी विभागाने दिली आहे.

गवळीदेव डोंगरावर काही भागावर नवी मुंबई मनपा पर्यटन स्थळ उभारणी करीत आहे . पर्यटन विकास करताना सर्व नियमांची काटेकोर अंमल बजावणी होत आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार काम केले जात आहे. – दिनेश देसले, वन क्षेत्रपाल, ठाणे.