नवी मुंबई : पनवेल शहरात मंगळवारी कॉंग्रेसच्या संविधान यात्रेदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका करत खळबळ उडवली. “लबाड मुख्यमंत्री आणि खोटारडे पंतप्रधान,” असा थेट आरोप यावेळी त्यांच्या भाषणात केला.
पनवेल बस आगार ते आदर्श नाका या मार्गावर संविधान यात्रा काढण्यात आली. लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या तत्त्वांची जपणूक करण्याच्या उद्देशाने ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. या यात्रेनंतर शहरातील वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात कॉंग्रेसचे स्वर्गीय नेते शाम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन आणि अन्य पदाधिका-यांनी उपस्थिती लावली. या नाट्यगृहात झालेल्या सभेत हर्षवर्धन यांचे भाषण झाले. यावेळी सपकाळ यांनी भाषणात मुख्यमंत्री लबाड आणि पंतप्रधान खोटारडे असल्याचा आरोप करत वातावरण तापवले.
सपकाळ म्हणाले, “नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सरकारने जनतेची दिशाभूल केली. मोदी जैविकदृष्ट्या (biological) कोण आहेत, याबाबतच शंका निर्माण होते; अशा व्यक्तीला काय म्हणावे?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. याचवेळी त्यांनी गौतम अदानी आणि मोदी सरकारमधील संबंधांवरही टीका केली. “अदानी हे मोदींचे निकटवर्तीय असल्याने मुंबई आणि नवी मुंबईसह देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या जागा त्यांना दान केल्या जात आहेत. हे केंद्र आणि राज्य सरकारचे नियोजनबद्ध खेळ आहे,” असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीविषयी सावध भूमीका ..
पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी महाविकास आघाडीत नवीन घटक पक्षांच्या प्रवेशाबाबत सावध भूमिका घेतली. “महाविकास आघाडी ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर संविधान रक्षणासाठी आणि भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला थोपवण्यासाठी आहे,” असे ते म्हणाले. या संविधान यात्रेमुळे पनवेलमधील मरगळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून आले. घोषणाबाजी, संविधान बचावाचे संदेश आणि सपकाळ यांच्या आक्रमक भाषणाने शहरात एकप्रकारे राजकीय तापमान वाढवले.