नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या रबाळे एमआयडीसीतील आर ९५२ भूखंडा वरील जेल फार्मा कंपनीत आगीची घटना घडली आहे. रात्री दोन वाजता लागलेल्या आगीवर सलग आठ तासांच्या प्रयत्ना नंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश मिळाले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु असून पूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.
नवी मुंबई लगत ठाणे बेलापूर औदयोगिक वसाहत आहे. याच ठिकाणी रबाळे भागातील आर ९५२ भूखंडा वरील जेल फार्मा या कंपनीला आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. या कंपनीत मेणा वापरून उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वालाग्रही रासायनिक पदार्थांचा वापर होतो. आग लागल्यावर याच रासायनिक घटकाच्या मुळे आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच पावणे रबाळे एमआयडीसी अग्निशमन दल घटना स्थळी पोहचले. मात्र आगीची व्याप्ती पाहता नवी मुंबई मनपाच्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीसाठी रवाना झाल्या. कंपनी एक मजली असली तरी आगीचा लोळ भडका पाहता जवळून पाणी मारणे शक्य नव्हते त्यामुळे उंच इमारतीवर आग लागल्यावर तेथ पर्यंत पोहचण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रान्टो गाडीचा वापर करण्यात आला.
रासायनिक पदार्थ वापर करणारी कंपनी असल्याने आग विझली तरी पुन्हा पुन्हा लागत होती. त्यामुळे आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री दोन ते सकाळी दहा पर्यंत अथक प्रयत्न केल्यावर आग विझली. सध्या कुलिंग चे काम सुरु आहे. आगीत कोणी जखमी वा मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. तसेच कंपनीत आग रोधक यंत्रणा होती कि नाही याचा तपास करण्यात येणार आहे. अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.