नवी मुंबई : शहरात एकीकडे अनधिकृत बांधकामे व बेकायदा धार्मिक स्थळे वाढत असताना दुसरीकडे महापालिका व सिडकोच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस शहरात बेकायदा नर्सरींची हातपाय पसरी वाढतच चालल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध विभागांत वाढणाऱ्या या बेकायदा रोपवाटिकांनी आता पालिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र आहे.

उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळच असलेल्या भूखंडावर थाटलेल्या बेकायदा रोपवाटिकेवर पालिकेने कारवाई केली होती. परंतु काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी रोपवाटिका सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या व मोक्याच्या जागा अडवून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचा डाव असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा : आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू… नैसर्गिक की हत्या? चौकशीची मागणी 

नवी मुंबईत शहरभर बेकायदा रोपवाटिकांनी सिडकोच्या व पालिकेच्या मोकळ्या जागा गिळंकृत करुन पदपथ ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सिडकोने कुंपण घातलेल्या भूखंडावरही ताबा मिळवून बेकायदा रोपवाटिका स्थापल्या आहेत. सिडकोच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेकडे सिडकोचा व पालिकेचा काणाडोळा होत आहे. तर बेकायदा नर्सरींनी बसथांब्यांनाही विळखा घालायला सुरुवात केली आहे. सिडकोच्या मालकीच्या अंगणात तसेच पदपथावर रोपट्यांची विक्री करण्याचा बेकायदा धंदा सिडको व पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महपालिकेच्या अनेक विभागांत अनेक ठिकाणी मोकळ्या जागा तसेच बसथांब्याभोवतीही अशाच प्रकारे नर्सरी थाटल्या आहेत.

अतिक्रमण होऊ नये म्हणून भूखंडांभोवती तारेचे कुंपण घातले आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत कोट्यवधींचे भूखंड सिडकोच्या ताब्यात आहेत. या भूखंडांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येणार नसल्याचे फलक सिडकोने लावले आहेत. परंतु अशा भूखंडांवर अतिक्रमण करून बेकायदा रोपवाटिका सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभागही आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : पनवेल : अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

पारसिक हिल येथील मुख्य जल केंद्राला लागूनच बेकायदा रोपवाटिका सरू असून मुख्य जलवाहिनीही त्यामध्ये लपली आहे. उद्या जलवाहिनी फोडून पाण्याचाही गैरवापर सुरू झाला तरी पालिकेला पत्ता लागणार नाही. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिध्द करताच पालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाने कारवाई केली. परंतू पुन्हा याच ठिकाणी नर्सरी उभारल्याचे पाहायला मिळत आहे.

एनआरआय परिसरातील डीपीएस शाळेसमोरील भूखडांवर बेकायदा रोपवाटिकेवर कारवाई करण्यात आली होती. पुन्हा या ठिकाणी बेकायदा नर्सरी थाटली असल्यास कारवाई करण्यात येईल.

शशिकांत तांडेल, सहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग

हेही वाचा : पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर

नेरुळ एनआरआय संकुल परिसरातील डीपीएस शाळेसमोरच्या भूखंडावर अतिक्रमण केले जात आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. या ठिकाणी फुलपाखरू उद्यान महापालिका व सिडकोने विकसित करावे.

सुनील अग्रवाल, सेव्ह एन्व्हायर्न्मेंट संस्था, नवी मुंबई</strong>

रोपवाटिकांना राजकीय आश्रय?

बेलापूर येथील जलउदंचन केंद्रालगत बेकायदा रोपवाटिका थाटलेल्या रोपवाटिकाधारकाला विचारणा केली. त्याने सांगितले की, एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याने मला इथे रोपवाटिका सुरु कर, मी आहे असे सांगितले असून या मोबदल्यात त्याला भाडे द्यावे लागत नाही. परंतू त्याच्या घरासाठी लागणारी झाडे व इतर कामे माझ्याकडून करून घेतली जातात.