नवी मुंबई: भ्रष्टाचार विरोधी ब्युरोचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने फोन करून अटक करण्याची धमकी देत २१ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपीने अतिरेकी कारवाईत सहभाग असलेल्या व्यक्तीचे खाते उघडून दिल्याचा आरोप फिर्यादी यांच्यावर केला होता.

कोपरखैरणे सेक्टर ५ येथे राहणाऱ्या एका ७४ वर्षीय जेष्ठ महिला नागरिकाची फसवणूक झाली आहे. फिर्यादी या घरात एकट्याच राहत असून त्यांचे अपत्य अमेरिकेत राहतात. त्यांना पाच तारखेला सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी व्हाट्स अप वरून एक व्हिडीओ कॉल आला होता. व्हिडीओ कॉल वर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख पोलीस आयुक्त म्हणून करून देत तुमच्या आधारकार्डचा गैर वापर करून अतिरेक्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे कॅनरा बँकेत खाते उघडून दिल्याचा आरोप फोन वरील व्यक्तीने फिर्यादी यांच्यावर केला.

विशेष म्हणजे त्या बदल्यात २० लाख रुपये कमिशन तुम्हाला मिळाले असून हे सर्व कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप हि फोनवरील व्यक्तीने केला. तसेच त्यामुळे तुमच्या विरोधात सीबीआय चौकशी करत असून तुम्हाला डिजिटल अटक करण्यात येत आहे. लवकरच तुमच्या अटकेनेचे आदेश देण्यात येतील. अशी धमकी दिली.

या प्रकरणी चौकशी होई पर्यंत सीबीआयच्या सरकारी खात्यात तुमच्या खात्यातील सर्व पैसे टाका असे सांगत एका बँक खात्याचा क्रमांक फिर्यादी महिलेस दिला. फिर्यादी महिलेने घाबरून खात्यावरील सर्व पैसे म्हणजेच २१ लाख २८० रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन वळते केले. विशेष म्हणजे चौकशी झाल्यावर हे पैसे परत तुमच्या खात्यात वळते होतील असेही सांगितले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही ना त्यांचा फोन आला ना पैसे आले. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी त्यांनी कोपरखैरणे पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. त्याची दखल घेत या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा संबंधित बँक खाते धारक आणि फोन वर बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन टाकळे करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी आदेश दिल्या प्रमाणे पोलिसांनी संबंधित बँकेशी संपर्क करून ते खाते सील केले आहे. त्यामुळे ३ लाख रुपये रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.