पनवेल : पनवेलमध्ये मागील २४ तासात ८२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सकाळी ९ वाजता पावसाचे पाणी कळंबोली उपनगरातील बैठ्या वसाहतींमध्ये शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. सोमवारी पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटांमध्ये मोसमी पावसाने जोरदार बरसण्याची सुरूवात केली त्यामुळे पनवेल, कळंबोलीसह सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.
पनवेल महापालिकेने रस्त्यांच्या काॅंक्रीटीकरणाची आणि नाले बांधकामे हाती घेतली आहेत. अर्धवट रस्त्यांच्या कामांमुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच जुन्या गटारांमधून पाणी निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याकडे ला पाणी साचल्याचे चित्र आहे.