नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी (५ ऑक्टोबर) समाज समता कामगार संघाचे नेते मंगेश लाड यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. सोमवारी (६ ऑक्टोबर) वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे आयोजित कामगार मेळाव्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. हल्ल्याच्या वेळी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून लाड यांना अश्लाघ्य शब्दांत शिवीगाळ करत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
लाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काही वक्तव्य केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, त्यातूनच हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कामगार संघटनेच्या अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची माहिती मंगेश लाड यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील कामगारांना किमान वेतन न मिळाल्याच्या मुद्द्यावर समाज समता कामगार संघाकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण सुरू आहे. आज या आंदोलनाचा ४ था दिवस सुरू होता. बेलापूर ते दिघा या विभागांमध्ये विकसित करण्यात आलेल्या तब्बल १७ लाख ५०३ चौरस मीटर उद्यान क्षेत्रात कार्यरत सुमारे ४० कामगारांना किमान वेतन आणि लेव्हीचे फायदे मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कामगारांना केवळ १२ हजार रुपये मासिक वेतन दिले जात असताना महानगरपालिका प्रत्येक कामगारामागे २७ हजार रुपयांचा खर्च दाखवते. “उरलेले १५ हजार रुपये कुठे जातात?” असा प्रश्न संघटनेचे नेते मंगेश लाड यांनी उपस्थित केला. ठेकेदार आणि उद्यान विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक संगनमत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
या आंदोलनात अनेक कामगार ६० वर्षांहून अधिक वयाचे असून, मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती कधीही बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कामगारांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण न मागे घेण्याचा इशारा दिला असून, हल्ल्याच्या घटनेमुळे आंदोलनातील तणाव आणखीनच वाढला आहे.