navi mumbai international Airport : ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा दिवस जवळ आलेला आहे. या विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरस्ते केले जाणार असून हे विमानतळ भव्य असणार आहे. या विमानतळाच्या कनेक्टिव्हीटी विषयी देखील मोठी चर्चा होत असून भविष्यातील बुलेट ट्रेन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र व्यापतो आणि पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे.
विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी भागातील प्रवाशांना त्याचा मोठा दिसाला मिळणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहे.
विमानतळ आणि बुलेट ट्रेन एकाच ठिकाणी
– देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद असा असणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या ठाणे, मुंबई उपनगरामध्ये सुरु आहे. येत्या तीन ते चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. याबाबत आता आणखी एक मोठी अपडेट आहे. विमानतळावर पोहचण्यासाठी नागरिकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
रस्ते, जल आणि ट्रेन अशा तिन्हीची कनेक्टिवीटी मिळणार आहे. त्यानुसार, अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे तो थेट मुंबईशी जोडला जाणार आहे. प्रस्तावित मेट्रो लाईन ८ अर्थात गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडेल. तर मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भूमिगत स्थानक असेल. त्यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना नवी मुंबई विमानतळ देखील गाठता येणार आहे. यासोबतच, भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील पहिला जलपरिवहन असलेला विमानतळ ठरणार आहे. वॉटर टॅक्सीमुळे मुंबई व आसपासच्या किनारपट्टीशी थेट जोडता येणार आहे.