नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाची बांधणी करत असताना पर्यावरणाची मोठी हानी झाल्याचा मुद्दा सातत्याने चर्चेत आला. या भागातून वाहत असलेल्या एका नदीचा संपूर्ण प्रवाह विमानतळाच्या कामासाठी बदलण्यात आला. चार मोठया टेकड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. कांदळवनांची मोठी कत्तल या भागात केली गेली. त्यामुळे हे विमानतळ भविष्यकाळात पर्यावरण पूरक कसे ठरेल असा सवाल सातत्याने उपस्थित होत असताना या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या नवी मुंबई विमानतळ कंपनी आणि सिडकोने मात्र पूर, वादळ अगदी ढगफुटी झाली तरी विमानतळाला धोका नाही असा दावा केला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे उद्धाटन होत असताना आसपास असलेल्या टेकड्या फोडण्याचे काम अजूनही सुरुच आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होताच काही दिवसातच विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलचे काम हाती घेतले जाणार आहे. साधारणपणे २०२९ पर्यत दुसरे टर्मिनल सुरु होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. हे विमानतळ पर्यावरण पूरक असेल असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, ‘आम्ही सर्वात वाईट ढगफुटीच्या परिस्थितीसाठीही तयार आहोत. विमानतळ ८.५ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे आणि त्याची चाचणी घेण्यात आली आहे. येथे कधीही पाणी साचणार नाही’, असा दावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅप्टन बी.व्ही.जे.के. शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विमानतळा लगतच असलेली नदी, पनवेल खाडीचा ओसंडून वाहणारा पाणीप्रवाह आणि मुसळधार पावसाचा विचार करुनच या विमानतळाची बांधणी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
धावपट्टया, टर्मिनलची विशिष्ट पद्धतीने उभारणी
या विमानतळात चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्या असतील. पहिल्या टप्प्यात ३,७०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद एक धावपट्टी आणि एक टर्मिनल समाविष्ट आहे. दुसऱ्या टर्मिनलच्या डिझाइन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अदानी समूहाने विस्तारासाठी आणखी ₹३०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. पूर्ण झाल्यानंतर NMIA मध्ये चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्या असतील आणि तो दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी (MPPA) हाताळू शकेल. पहिल्या टप्प्यात ही क्षमता २० MPPA इतकी असेल. दुबई किंवा हिथ्रोसारख्या “आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र” म्हणून NMIA चे स्थान निश्चित करण्यात आले आहे, असा दावाही कॅप्टन शर्मा यांनी केला.
मुंबई पुन्हा मोठे विमान केंद्र ठरेल
मुंबईत एअरलाईन्सना अतिरिक्त स्लॉट मिळत नव्हते. त्यामुळे कालांतराने लोकांनी दिल्लीहून प्रवास करणे पसंत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत असताना ही परिस्थिती बदलेल असा दावा सिडकोने केला अहो. पुढील पाच ते सात वर्षात गर्दीचे व्यवस्थित नियोजन होऊ शकेल, असे अदानी एअरपोर्टस होल्डीग लिमीटेड (Adani Airports Holdings Ltd (AAHL)) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले. सध्या मुंबईतून युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख ठिकाणांसाठी थेट उड्डाणांची कमतरता आहे. ही परिस्थिती आता बदलेले असा दावाही त्यांनी केला. प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त नवी मुंबई विमानतळ देशातील सर्वात मोठे देखभाल, दुरुस्तीचे (Maintenance, Repair and Overhaul) आणि शांघायप्रमाणे कार्गो केंद्र बनेल, अशा पद्धतीचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. सुरुवातीच्या टप्प्यात ०.५ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक कार्गो क्षमता असणार असून, पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर ती ३.२ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.