उरण : बुधवारी नवी मुंबई विमानतळाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र यावेळी नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दिबांच्या नावाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी संकेत ही न दिल्याने भूमिपुत्रांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई विमातळाला माजी खासदार दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २०२१ पासून रायगड,ठाणे,मुंबई, नवी मुंबई व पालघर या सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. यासाठी दि.बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून राज्य व केंद्र सरकार आणि केंद्रीय विमान उड्डायन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. हे नाव देणार कारण राज्य सरकारकडे एकमेव दिबांच्या नावाचा ठराव आहे.
या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असल्याची माहीती ३ ऑक्टोबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सर्व पक्षीय नामकरण समिती सोबतच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याचप्रमाणे यावेळी केंद्राकडून नामकरणाचे नवे नियम तयार केले जात असल्याचे स्पष्ट करीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भिवंडीचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी नामकरणाच्या मागणीसाठी घोषित केलेला मोर्चा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानंतर स्थगित करण्यात आला होता.
यावेळी उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे नवी मुंबई विमातळाला दिबांचे नाव देण्याचे संकेत देतील असा विश्वास भूमिपुत्रांना होता. मात्र बुधवारी विमानतळ उदघाटनाच्या वेळी झालेल्या जाहीर सभेत बोलतांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी दिबांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र नवी मुंबई विमानतळाला देण्यात येणाऱ्या नावा बद्दल कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. यामुळे स्थानिक भूमीपुत्र पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत. याविषयी विविध समाजमाध्यमातून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. उदघाटनानंतर आता दि.बा.पाटील नामकरण सर्वपक्षीय समिती काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वेगळ्या नावाच्या चर्चेला उधाण :
नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या ऐवजी रतन टाटा यांचे नाव दिले जाईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी सकाळ पासूनच ही चर्चा सुरू होती. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नामकरणाचे किमान संकेत देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र भाषणानंतर नवी मुंबई विमातळाच्या नामकरणाचा प्रश्न पुनः एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थगित आंदोलन पुन्हा ?
माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमातळाला नाव देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय समिती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले होते. ते आता विमानतळाला दिबांचे नाव देण्याचे संकेत न मिळाल्याने पुन्हा एकदा करण्यात येणार का याकडे आता भूमिपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यात अडथळा :
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ हे आशिया खंड आणि जगातील विमातळाच्या सर्वोत्तम स्पर्धेतील विमानतळ आहे. अशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे या विमानतळाला दिबांचे नाव देणे योग्य होईल का ? दिल्यास काय परिणाम होईल केंद्र सरकारचे नामकरणाचे नवे निकष काय असतील त्यात दिबा पाटील यांचे नाव बसेल का ? आदी प्रश्नांची चर्चा आता होऊ लागली आहे.
