उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने पुन्हा एकदा भूमिपुत्र आणि सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समिती लवकरच एक निर्णायक बैठक घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबरच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनावर थांबायचे की पुन्हा लढायचे ते या बैठकीत ठरेल.

विमानतळाला नाव देण्यासंदर्भात सरकार करीत असलेल्या दिरंगाईमुळे भूमिपुत्रांमध्ये पुन्हा एकदा असंतोष पसरू लागला आहे. त्यामुळे उद्घाटनानंतर त्वरित भूमिपुत्रांनी विमानतळाला केवळ दिबांचे नाव अशा घोषणा देत एकप्रकारे पुन्हा संघर्षाचे बिगुल फुंकले आहे. सर्वपक्षीय नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी उद्घाटनानंतर तातडीने समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या बैठकीत ३ ऑक्टोबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला लागणारा वेळ द्यायचा की समितीच्या वतीने पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घ्यायची याचावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी उदघाटनाच्या वेळी नामकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे किमान संकेत देण्याची अपेक्षा होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीकडे आता भूमिपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र समितीच्या बैठकीत भाजपचे नेते आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात यावरच निर्णय ठरणार आहे.

उद्घाटनाच्या वेळी दिबांचे नाव घेऊन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचे दिबांचे कुटुंबीय म्हणून आभारी आहोत. मात्र या कार्यक्रमात त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे किमान सूतोवाच केले असते तर अधिक आनंद झाला असता असे मत दिबांचे चिरंजीव अतुल दिबा पाटील यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केले. त्याचप्रमाणे नामकरणासंदर्भात सर्वपक्षीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजमाध्यमावर घमासान

– नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव मिळावे यासाठी रायगड, ठाणे, मुंबई व पालघर या जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी २०२१ पासून संघर्ष सुरू केला होता.

– त्यातूनच केंद्र व राज्य सरकारने विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी सहमती दर्शविली. यासाठी वारंवार झालेल्या बैठकीत आश्वासने दिली आहेत.

– उद्घाटन पार पडल्यानंतरही विमानतळ नामकरणाचे आश्वासन पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसल्याने चारही जिल्ह्यांतील तरुण संतप्त झाले आहेत. याचे पडसाद समाजमाध्यमांत उमटत आहेत. – सरकार, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना समाजमाध्यमातून प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे.