वाशी-कोपरखैरणेच्या सीमेवर असलेले ‘कलश उद्यान’ ही वसाहत गेली अनेक वर्ष नवी मुंबईच्या सत्ताक्षेत्राचे केंद्रबिंदू राहिली आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखणारे वनमंत्री गणेश नाईक हे या वसाहतीमधील निवासी. उच्चभ्रू रहिवाशांचा भरणा असलेल्या याच वसाहतीपासून अगदी दीड-दोन मिनिटांच्या अंतरावर कोपरी नावाचा एक उड्डाणपूल आहे. सकाळ, सायंकाळ, रात्री कधीही या पुलावरून प्रवास केला तर नजरेला धुरके आणि नाकाला उग्र दर्प जाणविल्याशिवाय राहात नाही. रात्री १२ नंतर तर या पुलाच्या परिसरात तीव्र धुरक्याची चादर असते. शहराचे राजकीय पालकत्व अनेक वर्ष ज्यांच्याकडे राहिले अशा नाईक कुटुंबीयांच्या निवासस्थानापासून जेमतेम अंतरावर हवेची ही स्थिती आहे. यावरून धूळ, धूर, धुरक्यात कोंडू लागलेल्या या शहराच्या प्रवासाची दिशा स्पष्ट होतेच आहे.
पर्यावरण, हवामान बदल, स्वच्छ हवा या विषयांवर गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशन आणि एन्व्हारोकॅटलिस्ट या संस्थेने नुकताच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारा अहवाल तपासला. या संकेतस्थळांवरील सलग आठ वर्षांच्या आकडेवारीचा या संस्थांनी अभ्यास केला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, बदलापूर, भिवंडी, मिरा भाईंदर या शहरांतील हवेची गुणवत्ता तपासली. विशेष म्हणजे नवी मुंबईतील बेलापूर या उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा वेगळा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात नवी मुंबईची हवा दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याचा स्पष्ट निष्कर्ष या संस्थांनी काढला आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाढती बांधकामे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक कामांमुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. नवी मुंबईसारखे एरवी नियोजित आणि पायाभूत सुविधांच्या आघाडीवर शिस्तीचे मानले जाणारे शहर यास अपवाद ठरू नये हे चिंताजनक आहे. एक काळ असा होता की शहराच्या पूर्वेकडील डोंगरांमधील दगडखाणींमुळे नवी मुंबईचे प्रदूषण वाढत असल्याची ओरड सातत्याने होत असे. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयात मोठ्या रासायनिक कंपन्यांच्या रांगा त्याकाळी दिसायच्या. पुढे या रासायनिक कंपन्या एकएक करून बंद पडल्या. दगडखाणींमधील धडधडही एव्हाना थंडावली आहे. शहराच्या प्रदुषणात भर पाडणारे हे दोन महत्त्वाचे स्रोत आटले ही जमेची बाजू धरली तरी मुंबई महानगर पट्टयातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होऊ लागला आहे.
शहरातील राज्यकर्त्यांना आणि येथील प्रशासकीय व्यवस्थेला प्रदुषणाचा हा मुद्दा जाणवू नये याचे खरेतर आश्चर्य आहे. महापे, खैरणे यांसारख्या एमआयडीसी पट्टयातून रात्रीच्या वेळेत हवेतून होणारे प्रदूषण सर्वसामान्यांना जाणवते, मात्र नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ते मान्य नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. कोपरी, वाशी सेक्टर २८,२६,२९,१९, जूहू गाव, तुर्भे या परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळेत जाणवणाऱ्या दर्पाची आता सवय होऊ लागली आहे. मध्यंतरी कोपरी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या प्रश्नांवर वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. एमआयडीसीतून कोपरखैरणे आणि पुढे खाडीच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यावर वेगवेगळ्या रंगांच्या रसायनांचा दिसणारा थर आणि येणारा उग्र दर्प नित्याचा आहे. नाईक यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यावरून सुनावले. मात्र असे काही प्रदूषण होते आहे हे एकदा मान्य करायचे नाही असे ठरविले तर कारवाई वगैरे तर दूरच राहाते. नवी मुंबईत नेमके हेच सुरू आहे. नवी मुंबई हे राज्यातील वेगाने प्रदूषित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. विविध प्रकल्पांची कामे, बांधकामे, वाहनांतून निघणारा धूर यामुळे या शहराच्या वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, असे स्पष्ट निष्कर्ष या संस्थांच्या अहवालातून पुढे आले आहेत.
त्रोटक उपाय, धुळफेक कारभार
नवी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या उपनगरांमध्ये प्रदूषणाची पातळी योग्य पद्धतीने मोजणारी यंत्रणा नाही. नवी मुंबई महापालिकेकडील पर्यावरण विभागाची सूत्र ही शहर अभियंता विभागाकडे आहेत. हा विभाग कोट्यवधी रुपयांची कंत्राटी कामे काढण्यात मशगूल आहे. धूळ वाढली की पाणी फवारणी करणाऱ्या गाड्या फिरवल्या की आपले काम झाले असा समज करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची येथे चलती आहे. मुंबईतील कचराभूमीवर राजरोसपणे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचा धूर वाशी, कोपरखैरणे यासारख्या उपनगरांना प्रदूषणाच्या गर्तेत ढकलत आहे. शहरात पुनर्विकास प्रकल्पांच्या बांधणीत प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली सुरू आहे. महापालिकेने या प्रकल्पांसाठी मोठी नियमावली तयार केली आहे. मात्र आपणच तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे कुणी पहायचे ? धूलिकण (पीएम२.५) हे सर्वात घातक असून शरीरातील फुप्फुस आणि रक्तप्रवाहात खोलवर जातात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यूचा धोका वाढतो. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत अशा नागरिकांना याचा सर्वाधिक परिणाम होतो. पीएम १० मुळे श्वसनाचे विकार, हृदयासंदर्भात आजार होऊ शकतात. हे धूलिकण श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात.
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पीएम २.५ ची पातळी सरासरी ४३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०३ इतकी नोंदविली गेली. नवी मुंबई विमानतळाची काम ज्या ठिकाणी सुरू आहे तेथून बेलापूर हे उपनगर अगदी जवळ आहे. या ठिकाणी धूलिकणांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाची खरे तर युद्धपातळीवर दखल घेण्याची आवश्यकता आहे. मात्र अनेक एनसीएपी शहरांपेक्षा जास्त प्रदूषण पातळी असूनही बेलापूर एनसीएपी कार्यक्रमाच्या बाहेर आहे. नवी मुंबईतील इतर भागात पीएम २.५ ची पातळी सरासरी ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०२ इतकी नोंदविली गेली. पीएम १० ची पातळी २०१९ ते २०२० पासून जवळपास १०० टक्के अधिक आहे. पावसाळ्यात या शहराला तात्पुरता दिलासा मिळतो. एरवी मात्र हे शहर धूळ, धूर आणि धुरक्यांचा भाग बनू लागले आहे.
