नवी मुंबई – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मुख्यालयासह सर्व विभागांमधील आपत्ती निवारण कक्ष यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बचाव व मदत कार्यासाठी सज्ज राहावे असेही निर्देश दिले आहेत. तर नवी मुंबई शहरातील ऐरोली दिघा परिसरात मागील २४ तासात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता शासन व प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.
नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे जुन्या किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आपल्या नजिकच्या महापालिका विभाग कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाशी अथवा मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण केंद्राशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे शहरात रात्रभर पाऊस पडत असून शहरातील बेलापूर ते दिघा परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. रविवार असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात दिसणारी वर्दळ आज पाहायला मिळाली नाही.
शहरातील मागील २४ तासातील पाऊस
बेलापूर – ५८.८० मिमी
नेरूळ – ६३ ४० मिमी
वाशी – ७१.४० मिमी
कोपरखैरणे – ६४ मिमी
ऐरोली – १०६.८० मिमी
दिघा – १०४. ८० मिमी
सरासरी पाऊस – ७८.२० मिमी
१ जून २०२५ पासून शहरात पडलेला एकूण पाऊस – ३२०५.२३ मिमी
१ जूनपासून मोरबे धरणात पडलेला एकूण पाऊस – ३९९० मिमी