पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, कक्ष ३ (पनवेल) यांनी हरवलेले तब्बल २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मालकांकडे शुक्रवारी सुपूर्द केले. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान किंवा खरेदीदरम्यान मोबाईल हरवण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांकडे नियमित येतात. मोबाईल हरवल्याने केवळ आर्थिक नुकसानासोबत त्या मोबाईल मधील संपर्क क्रमांक, खासगी फोटो, व्हिडिओ, संदेश यांमुळे भावनिक हानीही नागरिकांना सहन करावी लागते.
या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुरू केलेल्या सीईआयआर या पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे आणि डीसीपी (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
पथकातील पोहवा इंद्रजित कानु यांनी सीईआयआर या पोर्टलवरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधीत सिमकार्ड धारकांशी संपर्क साधला. मागील तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून १२२ मोबाईल शोधून काढण्यात यश आले.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी सहायक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, पोलीस उपपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सहाय्यक फौजदार अनिल पाटील, तसेच रमेश शिंदे, प्रशांत काटकर, प्रमोद राजपुत, निलेश पाटील, दिपक डोंगरे, सागर रसाळ यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही कामगिरी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी सांगितले.मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, भविष्यातही अशीच कामगिरी सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.