नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने पालिका इतिहासात प्रथमच नागरिकांना वर्षभराचे एकत्र देयक (बिल) देण्यात येत आहे. नागरिक तीन महिन्यांचे तसेच वर्षभराचे देयक एकत्र भरू शकतात. मालमत्ताधारकांनी वर्षाचे एकत्र बिल भरल्यास सामान्य करात १० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्षातही बिल देण्यासाठी महिला बचत गटाच्या मदतीनेही देयकांचे वाटप होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ताकराशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाइलवरही मालमत्ताकर बिल पाहता येणार आहे. तसेच विविध यूपीआय सुविधेद्वारे सहज घरबसल्या मालमत्ता कर भरणा करता येणार आहे. नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात लाखो मालमत्ताधारक आहेत. पालिकेने यंदाच्या मालमत्ताकर वसुलीत रेकॉर्डब्रेक ८२६ कोटी एवढी मालमत्ता कर वसुली केली आहे.

कर वसुली करण्यासाठी दरवर्षी पालिकेला विविध उपाययोजना कराव्या लागतात तसेच अटकावणी करून मालमत्ता कर वसुली करावी लागते. पालिका क्षेत्रात आतापर्यंत प्रत्येकी ६ महिन्यांचे मालमत्ता देयक नागरिकांना दिले जात होते. परंतु हे देयक प्राप्त होतानाही अडचणी येत असत. विभागनिहाय ४ ते ५ कर्मचारी हे देयकवाटप करत असत. त्यामुळे ती कधी वेळेत प्राप्त होत नसत. त्यामुळे नागरिकांना मुदतीत बिल भरणा न केल्याने दंडही भरावा लागत असे. परंतु आता ऑनलाइनद्वारे बिल प्राप्त होणार असून ते घरबसल्या भरता येणार असल्याने या प्रक्रियेत सुलभता आली आहे.

महिला बचत गटांची मदत

प्रत्यक्ष देयकवाटप करण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. एका महिलेला सरासरी एक हजार बिले वाटप करायला दिली जाणार आहेत. बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ताधारकाचा अद्ययावत मोबाइल क्रमांक, ई मेल, गुगल लोकेशन, नागरिकांच्या मालमत्तेचा फोटो आदी माहिती घेऊन ती सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत केली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकाला मोबाईल ॲपवर ईमेलद्वारे बिलांचे वाटप करता येणार आहे. मालमत्ता धारकांनी एकत्रित वर्षाचे बिल भरणा करुन सामान्य करात १० टक्के सूट मिळवावी असे आवाहन मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी केले आहे.

नवी मुंबई शहरातील मालमत्ताधारकांना आता घरबसल्या यूपीआयच्या विविध माध्यमांद्वारे मालमत्ता कर भरता येणार आहे. तसेच मालमत्ताधारकाने एकत्रित वर्षभराचे मालमत्ता कर भरल्यास मालमत्ताधारकांस सामान्य करात १० टक्के सूट दिली जाणार आहे. पालिकेलाही प्रत्येकी ६ महिन्याचे असे दोनवेळा बिल वाटप करावे लागणार नाही. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मालमत्ता कर वसुली

वर्ष -२०२४- २५- ८२६ कोटी
वर्ष -२०२३-२४- ६६६ कोटी

वर्ष- २०२२-२३- ५७६ कोटी
वर्ष- २०२१-२२- ५२१ कोटी