उरण : नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने या परिसरात ये जा करणाऱ्या अटलसेतुच्या जासई मार्गिकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या मार्गिका सुरू करण्याची मागणी आता येथील प्रवाशांकडून केली जात आहे. मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा अटलसेतु सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण होत आले असले  तरी या सागरी पुलाला उरण पनवेल मार्गावरून जासई वरून जोडणाऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण आहे. या मार्गिकांची कामे लवकरात लवकर करून प्रवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी विधानसभेच्या नुकताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केली होती.

तर याच मार्गाला जोडणाऱ्या उरण पनवेल उड्डाणपुलाची एक मार्गिका जासई येथील शंकर मंदिरामुळे रखडली आहे. अटलसेतुवर मुंबईत ये जा करण्यासाठी चिर्ले व उलवे नोड प्रमाणेच जासई येथून ही मार्गिका आहे. या उरण पनवेल मार्गावरील मार्गिकांमुळे उरण मधील वाहनचालकांना कमी वेळात मुंबई गाठता येणार आहे.मात्र ही मार्गिका सागरी मार्ग सुरू होऊनही दोन वर्षात पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे येथील वाहन  चालकांना अधिकचे अंतर असलेल्या चिर्ले मार्गाचा वापर करावा लागत आहे. या मार्गिकेचे काम वन विभागाच्या परवानगीसाठी भूसंपादनाच्या अभावी रखडले आहे.

तर दुसरीकडे याच मार्गाला जोडणाऱ्या जेएनपीए ते आम्रमार्ग या मार्गावरील जासई उड्डाणपूलाच्या मार्गिकेत अनेक वर्षाचे शंकर मंदीर आहे. या मंदिरासाठी पर्याय म्हणून जेएनपीए कडून देण्यात येणारा पुरेसा निधी न मिळाल्याने ग्रामस्थांनी मंदीर हटविण्यास विरोध केला आहे. जो पर्यंत मंदिराचा निधी मिळणार नाही तो पर्यंत मंदीर कायम राहील अशी भूमिका जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत यांनी घेतली आहे. यासाठी जेएनपीए आणि भारतीय रस्ते विकास प्राधिकरण(एनएचआय)कडे पाठपुरावा सुरू आहे. या वर्षात तरी यावर तोडगा निघेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 अपघाताची शक्यता : जासई उड्डाणपूला वरून एका मार्गिकेतून वाहतूक सुरू आहे. मात्र वाहनांचा वेग आणि अरूंद मार्गिका यामुळे उड्डाणपुलावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

अटलसेतुला जोडणाऱ्या जासई येथील एका मार्गिकेच काम अपूर्णावस्थेत आहे. याच ठिकाणावरून येथील डोंगर माथ्यावरून पावसाळ्यात येणारे पाण्याचे वाहते झरे आणि त्या सोबत येणारे चिखल माती ही वाहून येत आहे. त्यामुळे जासई उड्डाणपुलाच्या खालील मार्ग हा चिखलमय बनला आहे.

उरण पनवेल मार्गावरील जासई येथून अटलसेतुवर ये जा करणारी मार्गिका लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी फिशरमन काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केली आहे.