नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे संकेत पालिका शिक्षण उपायुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक शिक्षक पालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागात एकाच शाळेत अनेक वर्षे काम करत असल्याने या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
नवी मुंबई क्षेत्रात पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या खासगी शाळांपेक्षा अधिक आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या या पवित्र पोर्टलद्वारे केल्या जातात तर माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या बदल्या पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत केल्या जातात. नवी मुंबई महापालिकेतील मुख्याध्यापकांच्या बदल्या गतवर्षी करण्यात आल्या होत्या परंतु दुसरीकडे मागील अनेक वर्षापासून माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. काही शाळांमध्ये शिक्षकांना १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे एकाच शाळेत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून एकाच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता पालिका शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमाच्या शाळा असून पालिकेने सीबीएसई शाळाही सुरु आहेत. एकीकडे मराठी, सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पालिकेने तासिका तत्त्वावर गेल्यावर्षीपासून शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या मागील काही वर्षापेक्षा व्यवस्थित असताना दुसरीकडे नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्या करण्याची तयारी पालिकेच्या शिक्षण विभागाने सुरू केली आहे. परंतु या बदल्यांना विरोध केला जात असून आधी शिक्षण विभागाचा कारभार सुधारण्याची मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महपालिकेत विविध माध्यमांच्या शाळा चालवल्या जात असून १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्ष एकाच शाळेत काम करत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. याबाबत विशेष संवर्गातील शिक्षकांची माहिती मागवली आहे. – संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त, शिक्षण विभाग.
ज्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यांना शासित करणे गरजेचे आहे. परंतु सरसकट बदल्या करणे चुकीचे असून बसलेली घडी विस्कळीत करण्याचा हा प्रकार आहे. शिक्षण विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्यांच्या आधी बदल्या कराव्यात. – सुधाकर सोनावणे, माजी महापौर.