पनवेल : नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात दिवाळीचा सण साजरा करता यावा, यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दिवाळी उत्सव काळात रात्रपाळीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन पालिकेच्या तब्बल १०४ स्वच्छता दूतांना (सफाई कामगारांना) रात्रपाळीस नेमले आहे. या दूतांनी दररोज १४० मेट्रीक टन कचरा गोळा केला. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात राबविली जात आहे.
सर्वसामान्यांना दिवसा शहर स्वच्छ मिळावे म्हणून पनवेल महापालिकेचे स्वच्छता दूतांचे हात रात्री राबत आहेत. रात्रपाळीच्या या कर्मचा-यांनी दररोज ४१.८ किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांची सखोल स्वच्छता केली. दिवसभर सणानिमित्त जमा झालेला कचरा तातडीने गोळा करून रस्ते स्वच्छ ठेवण्याचे कार्य या कर्मचाऱ्यांनी केले. या प्रक्रियेत ९ घंटागाड्या, ७ टिपर, १ जेसीबी आणि १ हायड्रा वाहनांचा वापर करून दररोज सुमारे १४० टन कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. विधाते यांनी दिली.
दिवाळीत फटाके, सजावट साहित्य, फुलांची पाने, पूजनसाहित्य आणि पॅकिंग मटेरियल यांचा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होत असल्याने ही विशेष मोहीम अत्यंत परिणामकारक ठरली. “स्वच्छ पनवेल, प्रगतिशील पनवेल” या ध्येयाने कार्यरत महानगरपालिकेने या उपक्रमाद्वारे सणकाळातही स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि वसाहती परिसरात रात्रपाळीमध्ये सातत्याने स्वच्छतेची कामे पार पडत असल्याने पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी विभागप्रमुख, आरोग्य निरीक्षक, चालक, सफाई कर्मचारी आणि नागरिकांचे कौतुक करत त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले.
