Navi Mumbai International Airport 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर) पार पडलं आहे. खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळखलं जाईल, असंही मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“विजया दशमी (दसरा) झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली, आता १० दिवसांनी दिवाळी आली आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळखलं जाईल. तसेच आज मुंबईला भूमिगत मेट्रो मिळाली आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मुंबई सारख्या व्यस्त शहराला जमीनीच्या खाली, ते देखील सर्व इमारतींना व्यवस्थित ठेऊन ही मेट्रो सेवा सुरू केली. त्याबद्दल सर्व इंजिनिअरांचं अभिनंदन”, असं मोदींनी म्हटलं आहे.
#WATCH | Navi Mumbai, Maharashtra | PM Modi says, "The new airports and the UDAN scheme for affordable air travel have made air travel easier in the country. pic.twitter.com/7bQsxitTuJ
— ANI (@ANI) October 8, 2025
“आज महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआयसह अनेक कॉलेजमध्ये नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, हाइड्रोजन, सोलर एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन अशा नवीन गोष्टी शिकायला मिळतील. या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. बा. पाटील यांचं कार्य देखील आठवतं. दि. बा. पाटील यांचं कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचं संपूर्ण जीवन प्रेरणा देतं. तसेच आपण आज मागच्या १२ वर्षांत वळून पाहिलं तर अनेक मोठमोठी कामे झाले आहेत. नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित आहे. या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे आहे, याचा अर्थ हे संस्कृती आणि समृद्धीचं एक प्रतिक आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महाराष्ट्राचे शेतकरी युरोप आणि बाहेरच्या देशांबरोबर देखील जोडले जातील. या विमानतळामुळे नवे उद्योग येतील, या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. जेव्हा आपल्या स्वप्नाला सिद्ध करण्याचा संकल्प असतो, जेव्हा देशवाशियांपर्यंत विकास पोहोचवण्याची इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग देखील निघतो. आपली हवाई सेवा यांचं एक उदाहरण आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.
“जेव्हा २०१४ मध्ये जनतेने मला संधी दिली तेव्हा मी म्हटलं होतं की, हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई प्रवास करता यायला हवा. या स्वप्नाला पूर्ण करणं खूप गरजेचं होतं की देशात नवीन-नवीन विमानतळ बनवले जावेत. आमच्या सरकारने यावर काम सुरू केलं. २०१४ पर्यंत आपल्या देशात फक्त ७४ विमानतळ होते, पण आज भारतातील एकूण विमानतळांची संख्या १६० च्या पुढे गेली आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.
“जेव्हा देशातील छोट्या-छोट्या शहरांत विमानतळ होतात तेव्हा हवाई प्रवासाठी विकल्प मिळतो. त्यासाठी देखील पैशाच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही उडाण योजना सुरू केली, कारण स्वस्तात लोकांना विमानाचं तिकिट मिळू शकेल. उडाण योजनेच्या माध्यमातून लोकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत”, असंही मोदी म्हणाले आहेत.