नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी भागात घराचे नूतनीकरण बेकायदा असून दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो स्वतः मनपा अधिकारी असल्याची भासवून दंड ठोठावण्याची धमकी देत “सेटलमेंट” च्या नावाखाली लाखो रुपये उकळत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत.

संदीप तावडे उर्फ अमोल पिसके असे त्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. नवी मुंबईत मनपा अधिकारी असल्याची थाप मारून दंडात्मक कारवाईची धमकी देत तो खंडणी उकळत होता. गेल्या अनेक महिन्यापासून त्याच्या विरोधात मनपा कडे तक्रारी येत होत्या. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास कोणी धसवत नव्हते. मात्र डॉ  अमृत  हंचारे यांनी वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शखाली अमोल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नवी   मुंबईतील सानपाडा येथे राहणारे डॉ  अमृत    यांनी वाशी येथे काही दिवसापूर्वी सदनिका घेतली होती. त्या ठिकाणी ते राहण्यासाठी येणार असल्याने त्या सदनिकेचे नूतनीकरण काम हाती घेतले होते. यासाठी त्यांनी गृहनिर्माण संस्थेची रीतसर परवानगी घेतली होती. काही दिवसापूर्वी स्वतः मनपा अधिकारी असल्याचे सांगत अमोल पिसके त्यांच्या कडे आला. त्याने हे नूतनीकरण बेकायदा अधिक अनधिकृत काम केल्या प्रकरणी दीड लाख रुपये दंड ठोठावला जाईल अशी धमकी दिली.

डॉ अमोल हंचारे आणि वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांची ओळख असल्याने घडला प्रकार त्यांनी  येडवे यांच्या कानावर टाकलं. त्यावेळी येडवे यांनी ती व्यक्ती मनपा अधिकारी नसून तोतया आहे. त्यांना एकही रुपया देऊ नये. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.याबाबत येडवे आणि डॉ अमोल हंचारे यांनी वाशी पोलीस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान  डॉ अमृत यांनी अमोल पिसके याच्याशी संपर्क करत दंड रक्कम बाबत बोलणी केली . त्यावेळी त्याने पंचेवीस हजार द्या मी निपटून घेतो असे सांगितले. हे पंचेवीस हजार घेण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी त्यांनी वाशीतील एका हॉटेल मध्ये भेटायचे ठरले. या भेटी वेळीच ठरल्या प्रमाणे वाशी पोलिसांनी सापळा लावला. त्या वेळी अमोल हा २५ हजार रुपये स्वीकारताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या चौकशीतून त्याचे नाव अमोल पिसके असून तो संदीप तावडे या नावाने मनपा अधिकारी म्हणून वावरत होता हे समोर आले.

विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि गेल्या काही महिन्यापासून तक्रारी येत होत्या. अशा लोकांना थारा न देता संबंधित विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अशा वृत्तीला आळा घालण्यातही लोकांनी पुढे यावे . तर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी माहिती देताना सांगितले कि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याने काही दिवसापूर्वी असेच एक लाख रुपयांची खंडणी घेतली असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. आम्ही कसून चौकशी करत आहोत.