पनवेल : कोकणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल येथील पळस्पे फाटा येथे महामार्ग खड्ड्यांमध्ये जणू गायब झाला आहे. या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होतो.
गेल्या वर्षी संपूर्ण नवी मुंबईत जानेवारी ते जून या दरम्यान १३९ जणांनी रस्ते अपघातामध्ये प्राण गमावले. यंदा ही संख्या १४३ वर पोहोचली. यामध्ये पनवेल उरणची संख्या ४० आहे. प्रशासनाने आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पुढाकार न घेतल्यास सर्वाधिक झपाट्याने विकास होणाऱ्या शहरासमोर ही अपघातांची समस्या गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवासाठी अवघा महिना शिल्लक असताना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे कमी झालेले नाहीत. मुंबई गोवा महामार्गाप्रमाणे मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडेगाव ते रोडपाली सिग्नल चौक, रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कल, पळस्पे फाटा ते जेएनपीटी महामार्गावरील सेवा रस्ते तसेच मुख्य रस्ते, पळस्पे फाटा येथील उड्डाणपुलाशेजारील सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
पनवेल व उरण या परिसरात कोन फाटा, पळस्पे फाटा, कळंबोली सर्कल, रोडपाली जंक्शन आणि गव्हाणफाटा हे पाच सर्वाधिक वाहतूक कोंडीची ठिकाण आहेत. गणेशोत्सवापूर्वीच्या आठवडाभरात पळस्पे फाटावरून मुंबई ठाणे येथून तब्बल लाखभर वाहने या महामार्गावरून कोकणात दाखल होतात. त्यामुळे पळस्पे फाटावरील खड्डे वेळीच बुजविण्याचे काम हाती न घेतल्यास गणेशभक्तांना वाहनकोंडीचा आणि खड्ड्यांचा सामना करावा लागेल.
पावसाळा असल्याने महामार्गावरील खड्डे आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना पत्राव्दारे संबंधित यंत्रणांना दिल्याने अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यामध्ये वाहन चालविताना दृश्यमानता कमी असल्याने चालकांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनाच्या चाकातील हवा तपासावी, वाहन रस्त्यात बंद पडू नये म्हणून वेळीच दुरुस्तीचे काम करावे. वाहनतळाविषयी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत आमचे समन्वय बैठका सुरू आहेत. – तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई