नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आलिशान हॉस्पिटॅलिटीचा नवा अध्याय उघडण्याची घोषणा रेडिसन हॉटेल ग्रुपने सोमवारी मुंबई येथील रेडिसन ब्लू इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी ३५० प्रशस्त व सुबक डिझाइन असलेल्या खोल्या आणि सुइट्समध्ये ‘रेडिसन कलेक्शन हॉटेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ उभारण्यासाठी रेडीसन हॉटेल उद्योग समूह आणि हिल क्रेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात हा करार केला. ‘रेडिसन कलेक्शन’ ब्रँडचे हे महाराष्ट्रातील पहिले आगमन ठरणार असून या पंचतारांकित होटलमध्ये रूफटॉप बारसह निवडक डायनिंग सुविधा उपलब्ध असणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील सेवा क्षेत्रात वाढत्या मागणीमुळे पुढील पाच वर्षात या प्रशस्त हॉटेलची उभारणी केली जाणार आहे. पनवेलमधील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या या हॉटेलचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २०३० च्या पहिल्या तिमाहीत उघडण्याचे लक्ष्य असलेल्या या हॉटेलमुळे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) परिसरातील व्यावसायिक, निवासी आणि लाइफस्टाइल प्रकल्पांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
विमानतळ सुरू झाल्यानंतर या भागातील प्रवासी, व्यापार आणि कॉर्पोरेट प्रवासात मोठी वाढ अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर, रेडिसन कलेक्शन हॉटेल या गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये एक नवीन आकर्षण ठरेल. या हॉटेलमध्ये ३५० आधुनिक आणि सुबकपणे डिझाइन केलेल्या खोल्या व सुइट्स, खास रेस्टॉरंट्स, रूफटॉप बार, जागतिक दर्जाचा स्पा, अत्याधुनिक वेलनेस सेंटर आणि मोठ्या इव्हेंट स्पेसची सुविधा असेल. त्यामुळे कॉर्पोरेट मीटिंग्ज, विवाह सोहळे आणि आलिशान सामाजिक कार्यक्रमांसाठी हे स्थान महत्वाचे ठरेल.
रेडिसन कलेक्शनच्या जागतिक दर्जाच्या सौंदर्य शास्त्राला अनुसरून या हॉटेलमध्ये आधुनिकता आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय ओळखीचे प्रभावी मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. रेडिसन हॉटेल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीओओ (दक्षिण आशिया) निखिल शर्मा म्हणाले, “नवी मुंबईतील जलद वाढ आणि आगामी विमानतळामुळे या भागात प्रीमियम हॉस्पिटॅलिटीची मोठी गरज निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनच नाही तर व्यावसायिक प्रवासालाही नवा आयाम मिळेल.”
ग्रुपचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर दवाशिष श्रीवास्तव यांनी सांगीतले की, हा करार पश्चिम भारतातील त्यांच्या आलिशान पोर्टफोलिओला बळकटी देणारा ठरेल आणि एमएमआरमधील वाढत्या मागणीला प्रतिसाद देणारा ठरेल. हिल क्रेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीएमडी देबाशीष चक्रबर्ती यांनी सांगितले की, “हा प्रकल्प नवी मुंबईच्या आधुनिकतेचे प्रतिबिंब ठरेल आणि या भागातील आलिशानतेचे नवे मानक ठरवेल.”
रेडिसन हॉटेल ग्रुप सध्या देशभरात २०० हॉटेल्स ऑपरेशन आणि विकास प्रक्रियेत असलेल्या अग्रगण्य आंतरराष्ट्रीय हॉटेल चेनपैकी एक आहे. नवी मुंबईतील हा करार भारताच्या प्रीमियम हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये त्यांच्या विस्ताराला नवे बळ देणारा ठरत आहे.
