लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : सिडकोने अडीच वर्षानंतर अखेर उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या दुरुतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे येथील बोकडवीरा,फुंडे,डोंगरी व पाणजे या चार गावातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हा खाडीपूल कमकुवत असल्याने या मार्गावरील एसटी व एनएमएमटी बस बंद आहेत. हा खाडीपूल त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी १२ ऑक्टोबरला जनवादी महिला संघटनेने सिडको कार्यालयावर आंदोलन केले होते. त्यावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता यांनी जानेवारी २०२४ पर्यंत पुलाची दुरुस्ती करून प्रवासी वाहनांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे.

खाडीपूल प्रवासी वाहनांसाठी बंद असल्याने येथील नागरिक,विद्यार्थी यांना अधिक वेळ आणि खर्चाचा प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून लांबलेला राज्य महामार्ग क्रमांक १०३ हा उरण चारफाटा, बोकडवीरा ते करळ फाटा असा साडेसहा किलोमीटरचा मार्ग १ सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाने सिडकोकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे मार्गावरील सिडको द्रोणागिरी कार्यालया समोरील खाडीपूल कधी दुरुस्त करणार असा सवाल नागरिकांकडून केला जात होता. या मार्गावरील हाईट गेटमुळे झालेल्या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. बोकडवीरा येथील अंकुश पाटील व त्यांच्या लहानग्या मुलीला न्याय द्या या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी सिडकोकडे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या उरण पनवेल रस्त्यावरील हाईट गेट हटवा व गेटमुळे अपघात झालेल्या जखमींना नुकसानभरपाई द्या,तसेच उरण पनवेल मार्गावरील एस टी प्रवासी बस सुरू या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

आणखी वाचा-मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे पनवेलमध्ये संघर्षाची चिन्हे

या मागण्यांवर सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग,वाहतूक यांचाट पाच तास सकारात्मक चर्चा होऊन ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र यामध्ये रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न होता. हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गावरील खाडीपूल लवकरात लवकर दुरुस्त करून वाहन चालक व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे हाईट गेट हटवा तसेच एसटी व एन एम एम टी सारखी प्रवासी वाहने सुरू करून बोकडवीरा, फुंडे,डोंगरी व पाणजे या गावातील विद्यार्थी आणि कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा आहे. त्यापासून दिलासा द्यावा अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.

२०२१ पासून सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालय व फुंडे स्थानकालगतच्या नादुरुस्त खाडी पुलामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जड व प्रवासी वाहनाने रोखण्यासाठी उरण पनवेल मार्गावर हाईट गेट बसविले आहेत. या बोकडविरा व फुंडे महाविद्यालया जवळील दोन्ही बाजूच्या हाईट गेटमुळे अधिक उंचीच्या वाहन चालकांना उंचीचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत.

आणखी वाचा-लेखी आश्वासन न पाळल्याने जीवन यात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांना सिडको भवनावरुन पोलीसांनी ताब्यात घेतले

उरण पनवेल मार्गावरील उरण एसटी स्टँड चारफाटा ते बोकडवीरा चारफाटा व पुढील बोकडवीरा ते करळ फाटा हा ६.५ किलोमीटर अंतराचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने सिडकोला हस्तांतरित केले आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती देखभाल याची जबाबदारी सिडकोकडे आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repair of the creek bridge on the uran panvel route has started mrj