Eknath Shinde, Ganesh Naik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते वनमंत्री गणेश नाईक यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असतानाच, शिंदे यांचे निकटवर्तीय नगरसेवक मात्र, सरसंघचालक मोहन भागवत यांचा वाढदिवस साजरा करण्यात अग्रभागी दिसू लागले आहेत. नवीमुंबईतील अनेक प्रभागांमध्ये संघ कार्यकर्त्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. बेलापूर विधान सभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

वाशी सारख्या उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये म्हात्रे यांना निर्णायक बहुमत मिळाले होते. यामध्येही संघकार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा राहिला होता. आगामी महापालिका निवडणूका शिवसेना आणि भाजपा एकमेकांच्या विरोधात लढवेल अशी नवी मुंबईत चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे कट्टर समर्थक मात्र, संघ चरणी आपण लीन असल्याचे चित्र पद्धतशिरपणे उभे करत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही हिंदुत्ववादी राष्ट्रवादावर आधारित संघटना आहे. या संघटनेची विचारधारा सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जपणूक आणि राष्ट्रभक्ती यावर आधारलेली आहे. भाजप हा पक्ष या विचारधारेवरच आपली राजकीय धोरणे आखतो. यामुळे दोन्ही संस्थांमध्ये कायम घनिष्ठ संबंध दिसून येतात. भाजपचे अनेक नेते संघा मधूनच घडलेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी यांसारख्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार लाभले आहे.

निवडणुकांमध्ये संघाचे स्वयंसेवक भाजपच्या मदतीसाठी प्रचार, बूथ मॅनेजमेंट आणि जनसंपर्क यात मोठ्या प्रमाणावर काम करतात. आगामी महापालिका निवडणूका येत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती असली तरी, प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष उघडपणे रंगत आहेत. दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबईत आगामी महापालिका निवडणूकांत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकमेकांविरुद्ध लढण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

अशा पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नगरसेवकांकडून संघाच्या कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन स्वत:ला संघनिष्ठ दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई शहरात शिवसेना (शिंदे गट) पक्षातील काही इच्छूक नगरसेवकांकडून फलक लावून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. राजकीय निवडणूकांमध्ये संघकार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या समर्थकांनी संघ कार्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही फलकबाजी केली आहे का अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.