नवी मुंबई: नवी मुंबईत साखळी चोरीच्या घटनेत वाढ होत असून एका संशयित आरोपीने सराईत चोरा प्रमाणे एका व्यक्तीच्या गळ्यातील १ लाख ८० हजार किमतीची दोन तोळे वजनाची सोनसाखळी घेऊन फरार झाला. हि घटना सकाळी साडे नऊच्या दरम्यान सी वुड्स सेक्टर ४४ येथे घडली. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.

नवी मुंबईत साखळी चोरीचे प्रमाणात वाढले असून पूर्वी जेष्ठ नागरिक महिला, तसेच घाईत असणाऱ्या महिलांची सोनसाखळी चोरी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र आता पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ झाल्याने पोलिसांच्या समोर अशा सराईत चोरट्यांना जेरबंद करून आळा घालणे आव्हान ठरत आहे.

सरासरी साखळी चोरीच्या किमान तीन घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात होत आहेत. विशेष म्हणजे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत सीसीटीव्हीचे चांगले जाळे आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र घडलेल्या घटना आणि गुन्हे उकल पाहता हे प्रमाण पोलिसांच्या साठी निराशाजनक आहे.  अशीच घटना सी वुड्स येथे घडली असून हि घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नवी मुंबईतील सी वुड्स सेक्टर ४४ येथे अमित गौतम नावाचे ४४ वर्षीय  व्यक्ती राहतात. ते काही कामानिमित्त ते बाहेर जाण्यासाठी सव्वानऊच्या सुमारास घराबाहेर पडले. घरापासून जवळ असणाऱ्या सेक्टर ४४ ए नॅशनल सी क्वीन टॉवर जवळून जाताना त्यांच्या मागून एक दुचाकी स्वार आला. येताना तो वेगात असला तरी अमित यांच्या जवळ आल्यावर त्यांनी गाडीचा वेग एकदम कमी केला. आणि काही कळण्याच्या आत त्याने अमित यांच्या गळ्यातील २ टोळ्यांचे एक लाख ८० हजार किमतीची सोन्याची साखळी हिसकावून गाडीचा वेग एकदम वाढवून पळून गेला. त्याच्या मागे पळत जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न अमित यांनी केला मात्र चोरटा दुचाकीवर असल्याने त्याला गाठणे शक्य झाले नाही.

हि सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अमित यांनी दिलेल्या तक्रारी वरून अनोळखी दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेलार हे करीत आहेत.